कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणन आणि इंटरनेट ऑफ थिंग्सच्या वाढत्या वापरामुळे यंत्रमानवांचे आणि पर्यायाने माणसाचे भविष्यदेखील रोमांचकपणे, पण जलदगतीने बदलत आहे. लोकांना विविध मार्गांनी मदत करणाऱ्या नवनवीन यंत्रमानवांची निर्मिती केली जात आहे. उदा, झिओमीने तयार केलेला सायबर डॉग यंत्रमानव; वृद्ध रुग्णांना त्यांच्या अंथरुणावरून व्हीलचेअरवर नेण्यास मदत करण्यासाठी निर्माण केलेला अस्वलासारखा दिसणारा रोबेअर रोबो; सौदी अरेबियाने नागरिकत्व दिलेली सोफिया नावाची ह्यूमनॉइड.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भविष्यात ह्यूमनॉइड हे मानवाचे अधिक स्वयं-जागरूक साहाय्यक आणि दैनंदिन साथीदार असतील. स्वयं-जागरूकता म्हणजे स्वत:चे अस्तित्व आणि सभोवतालचे जग ओळखण्याची क्षमता असणे. यामुळे ह्यूमनॉइड त्यांच्या स्वत:च्या विचार आणि भावनांच्या मदतीने स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतात. हे ह्यूमनॉइड कारखान्यांमध्ये एकसारखी, परत-परत करावयाची कामे सहज आणि अचूक करतील. इथून पुढे, गरजेनुसार सहजपणे पुन्हा रचना करता येऊ शकणाऱ्या आणि पुन्हा प्रोग्रॅम करता येणाऱ्या ‘मॉड्युलर ह्यूमनॉइड’ची जास्त मागणी असेल. जपान सध्या आजारी आणि वयस्कर लोकांची काळजी घेणारे दाई ह्यूमनॉइड बनवत आहे. भविष्यात, घरात लहान मुलांना आणि वयोवृद्धांना सोबत करतील असे ह्यूमनॉइड बनवण्याचा शास्त्रज्ञांचा प्रयत्न चालू आहे.

स्वायत्त ह्यूमनॉइड म्हणजे मानवी नियंत्रणाशिवाय कार्य करणारे ह्यूमनॉइड. हे हुशार स्वायत्त ह्यूमनॉइड लहान मुलांप्रमाणे आपले निरीक्षण करून शिकतील. ते स्वयंशिक्षित असतील. ईव्ह हा एक कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त ह्यूमनॉइड कामगार आहे. तो कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे नवीन कामे शिकून आणि जुन्या चुका सुधारून कारखान्यातील कामात यशस्वीपणे भाग घेतो. ऑप्टिमस हा ह्यूमनॉइडसुद्धा सर्व हालचाली मानवी नियंत्रणाशिवाय करतो. हे स्वायत्त ह्यूमनॉइडच्या दृष्टीने पहिले पाऊल म्हणावे लागेल.

भविष्यात ह्यूमनॉइडमध्ये समतोल, आणि सहज लवचीक शारीरिक हालचाली करणाऱ्या यंत्रणा असतील. ते कृत्रिम मज्जासंस्थेतील न्यूरल जाळे प्रणालींचा वापर करत विविध संवेदकांनी सुसज्ज असतील. त्यामुळे त्यांना स्पर्शज्ञान, गार-गरम यांची जाणीव होईल. ते प्रतिक्षिप्त क्रिया समजू शकतील. ह्यूमनॉइडमध्ये दृष्टी आकलनासाठी अधिकाधिक प्रगत कॅमेऱ्यांचा उपयोग होईल तर खोली समजण्याकरिता त्यात प्रगत लायडर तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. लायडर हे सभोवतालचे अंतर आणि हालचाल मोजण्यासाठी लेसर किरण वापरणारे दूरसंवेदन तंत्रज्ञान आहे.

सन २०३० पर्यंत २० दशलक्ष यंत्रमानव जगभरात कार्यरत असतील. तसेच सन २०४५ मध्ये भविष्यातील यंत्रमानव माणसापेक्षाही हुशार होऊन वरचढ ठरतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta kutuhal advanced humanoid artificial intelligence internet of things dog robot amy