सुमारे १०० वर्षांपूर्वी वीजशक्तीने जगातील उद्योग, कृषी, परिवहन अशा जवळपास सर्व क्षेत्रांत क्रांती केली, तसेच काहीसे कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आता घडत आहे.

डेटा मायनिंग, नैसर्गिक भाषा विश्लेषण, आकृतिबंध शोधन, तज्ज्ञ प्रणाली विकसन, यंत्रमानव निर्मिती अशा बहुविध तंत्रज्ञानाने साकार होत असलेली कृत्रिम बुद्धिमत्ता मानवापेक्षा सर्व बाबतींत वरचढ होऊन त्याला गुलाम बनवेल का, नष्ट करेल का हे प्रश्न चर्चेत असले तरी, वास्तवात ते घडणे बरेच दूर आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील संशोधकांची मते जाणून घेणारा अलीकडील एक व्यापक अभ्यास सांगतो की सर्व कामे स्वयंचलितपणे करू शकणाऱ्या प्रणाल्या किमान १२० वर्षे तरी संभव नाही. मात्र, येत्या १५ वर्षांत ट्रक चालवणे, मधुर संगीत तयार करणे यांसारखी कामे नवीन प्रणाल्या बिनचूक करू शकतील. सुदैवाने असाही अंदाज आहे की आगामी काही वर्षे, सुमारे साडेपाच कोटी नवीन रोजगार दरवर्षी निर्माण होतील.

हेही वाचा >>> कुतूहल : कला क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता

एकूणच कृत्रिम बुद्धिमत्ता दुधारी तलवारीसारखे आहे. म्हणजे इष्ट परिणाम मिळतील पण त्यासोबत काही अप्रिय परिणाम होणे अपरिहार्य आहे. एकीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता स्वप्नवत वाटणारी उत्पादने आणि सेवा उपलब्ध करून देते यात शंका नाही तर, दुसरीकडे ती फार मोठ्या प्रमाणात सध्या अस्तित्वात असलेल्या नोकऱ्यांवर गदा येणार ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे दूरगामी परिणामांचा ऊहापोह बाजूला ठेवून या जवळच्या कळीच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून मार्ग आखणे ही आपली प्राथमिकता असली पाहिजे.

त्या दृष्टीने शैक्षणिक क्षेत्रात कुठले लक्षणीय बदल करावे याची गंभीर दखल घ्यावी लागेल. नवे रोजगार कुठल्या क्षेत्रांत आणि कशा स्वरूपाचे असतील हे त्यासाठी समजून घेणे गरजेचे आहे. त्याचसोबत नोकरी गमावलेल्यांना कुठली नवी कौशल्ये शिकवून परत रोजगार मिळवण्यास मदत होईल याचे नियोजन करावे लागेल. तसे पाठ्यक्रम आखून शिक्षण व प्रशिक्षण व्यवस्था उभारावी लागेल. त्यांत वारंवार बदल करण्याची लवचीकता ठेवावी लागेल.

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे श्रीमंत अधिक श्रीमंत होतील आणि गरीब पुढे जाऊ शकणार नाहीत, असे घडू नये ही बाबदेखील तेवढीच महत्त्वाची आहे. म्हणून उत्पन्न, सुखसुविधा आणि समृद्धीचे वाटप समाजात शक्यतो समान स्वरूपात होईल अशी आर्थिक-सामाजिक व्यवस्था उभारणे गरजेचे असेल. कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वांना सहजपणे वापरता येणे आणि तिच्यामुळे प्रगतीसाठी समान संधी उपलब्ध करून देणे, महत्त्वाचे ठरेल. तरच हे तंत्रज्ञान वरदान ठरेल.

डॉ. विवेक पाटकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

Story img Loader