‘स्मार्ट शहर’ हे एक नागरी केंद्र असून तिथे भौतिक पायाभूत सुविधा, पर्यावरणास अनुकूल इमारती, दळणवळणाची प्रभावी साधने आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत अर्थव्यवस्था कार्यरत असते. सर्व नागरिकांना मूलभूत गरजा पुरवण्यासाठी तेथील यंत्रणा अत्याधुनिक असते. स्वयंचलित संवेदक जाळे आणि मोठ्या विदा केंद्रांसह अनेक प्रकारच्या तांत्रिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. भारत सरकारने इंदूर, अहमदाबाद, भुवनेश्वर, कोची, जयपूर, लुधियाना, नागपूर व पुणे इत्यादी शहरे ‘स्मार्ट सिटी’ उपक्रमासाठी निवडली आहेत. या शहरांचे आणि तेथील नागरिकांचे जीवनमान उंचावून त्यांच्या सांस्कृतिक परंपरा आधुनिक तंत्रांनी जोपासण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नागरिकांचे जीवन सुलभ व्हावे, त्यांच्यावरचा शारीरिक व मानसिक ताण कमी व्हावा, तसेच शहरातील घडामोडींची माहिती त्यांना सहजगत्या मिळावी, यासाठी आधुनिक तंत्रे वापरली जातात.
स्वच्छ वातावरण, शुद्ध पेयजल, पुरेसा विद्याुत पुरवठा, स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य आणि शिक्षण, कुशल प्रशासन (ई-गव्हर्नन्स), नागरिकांचा सहभाग, गरिबांसाठी परवडणाऱ्या घरांची सुविधा, माहिती तंत्रज्ञान जाळे आणि दस्तावेज अंकीकरण (डिजिटायझेशन) हे स्मार्ट सिटी विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे घटक आहेत. आधुनिक शहरे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साधनांमुळे, इंटरनेट ऑफ थिंग्ज तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेची अनेक प्रारूपे यांचा वापर करून नागरिकांची सुरक्षितता आणि सुविधा यांत भर घालत आहेत. शहरातील वाहनकोंडी कमी करण्यास मदत करत आहेत, आपत्ती निवारणात तसेच प्रदूषण कमी करण्यास साहाय्य करत आहेत.
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्रशिक्षण (मशीन लर्निंग) अल्गोरिदम या दोन गोष्टी स्मार्ट शहरांचा अविभाज्य घटक आहेत आणि म्हणूनच स्मार्ट शहरे वसविण्यात त्या महत्त्वाच्या आहेत. यंत्र शिक्षित वाहतूक संवेदके, इंडस्ट्रियल कंट्रोल सिस्टीम, व्हिडीओ कॅमेरा, पर्यावरण संवेदक, स्मार्ट मीटर्स या सर्व उपकरणांतून मिळालेल्या सर्व विदांचे पृथक्करण केल्यानंतर जी माहिती हाती येते, ती स्मार्ट शहरांची योजना तयार करण्यासाठी उपयुक्त ठरते. कृत्रिम बुद्धिमत्तेत प्रचंड विदेचे जलद व अचूक विश्लेषण करण्याची क्षमता आहे. त्यामुळे एखाद्या शहराचा कल ओळखणे, तेथील जीवनमानाचा ‘पॅटर्न’ जाणून घेणे शक्य होते. त्याचप्रमाणे शहराकडे उपलब्ध असलेली संसाधने कशी वापरली जावीत यासाठी योजना तयार करता येतात. स्मार्ट शहरे हवामान बदलाला चालना देणार नाहीत अशाच प्रकारे वसविली जात आहेत. ही जबाबदारी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पार पाडली जाते.
– डॉ. किशोर कुलकर्णी
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
सकेंतस्थळ : http://www.mavipa.org