बुद्धिबळाच्या खेळात जगज्जेत्या कॉस्पोरॉव्हवर मात केल्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संगणकतज्ज्ञांना त्याहून मोठी आव्हानं खुणावायला लागली आणि त्यांनी आपला मोर्चा ‘गो’ या खेळाकडे वळवला. ‘गो’ हा अत्यंत पुरातन असा अत्यंत लोकप्रिय चिनी खेळ आहे. जगातले कोट्यवधी लोक हा खेळ खेळतात. १९ ७ १९ घरांच्या पटावर हा काळ्या आणि पांढऱ्या सोंगट्यांच्या माध्यमातून खेळला जातो. प्रतिस्पर्ध्याच्या सोंगटीला आपल्या सोंगट्यांनी सर्व बाजूंनी घेरलं की ती सोंगटी मरते आणि पटावरून बाहेर जाते असा हा खेळ. वरवर सोपा वाटणारा हा खेळ अत्यंत अवघड समजला जातो. बुद्धिबळाच्या खेळात दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी ३ खेळ्या केल्यावर खेळाच्या १ कोटी २१ लाख शक्यता संभवतात, तर ‘गो’च्या खेळात दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी ३ खेळ्या केल्यावर खेळाच्या १०००००००००००००००, म्हणजे १ या आकड्यावर १५ शून्ये इतक्या शक्यता संभवतात. ही संख्या जगातल्या अणूंच्या संख्येपेक्षा मोठी आहे. यावरून या खेळाच्या किचकटपणाची कल्पना येईल. ‘डीपमाइंड’ या कृत्रिम बुद्धिमत्तेला वाहिलेल्या कंपनीने ‘अल्फागो’ या संगणक प्रणालीला कृत्रिम न्यूरल नेटवर्कच्या माध्यमातून ‘गो’ हा खेळ शिकवला.
हेही वाचा >>> कुतूहल : ‘डीप ब्लू’ला ‘कृत्रिम बुद्धी’ होती?
‘अल्फागो’ला शिकवताना सखोल शिक्षणाची पद्धत वापरण्यात आली. यासाठी त्याला मानवी खेळाडूंनी खेळलेल्या दीड लाख खेळांची विदा देण्यात आली. त्यातून खेळायला शिकलेल्या ‘अल्फागो’च्या अनेक प्रती बनवून त्यांना एकमेकांशी खेळवण्यात आलं. या आपापसांत खेळलेल्या डावांमधून ‘अल्फागो’ची अधिक तयारी झाली. २०१६ च्या मार्च महिन्यात ‘अल्फागो’ प्रणाली ली सेडालसोबत पाच डावांची एक मालिका खेळली. ‘गो’च्या खेळातला सर्वोच्च दर्जा असलेला ली सेडाल हा जगज्जेता तोवर १८ आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकला होता. या मालिकेतला पहिला डाव अल्फागो जिंकला. दुसऱ्या डावातली ‘अल्फागो’ने खेळलेली ३७ वी खेळी ही ‘गो’च्या आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात ऐतिहासिक समजली जाते. त्याने केलेली खेळी इतकी अभूतपूर्व होती, की तो खेळ बघणाऱ्या सर्व तज्ज्ञांना असं वाटलं की ‘अल्फागो’ने खेळताना चूक केली. ती खेळी बघून सेडाल इतका बुचकळ्यात पडला, की त्या खेळीला उत्तर द्यायला त्याने तब्बल १५ मिनिटं घेतली. पण ‘अल्फागो’च्या याच खेळीमुळे त्या डावाची बाजी पलटली आणि तो डाव ‘अल्फागो’ जिंकला. ‘गो’च्या चार हजार वर्षांच्या इतिहासात अशा खेळीचा विचार ‘गो’च्या एकाही मानवी खेळाडूने केला नव्हता. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सर्जनशीलतेचं हे उत्तम उदाहरण आहे. अल्फागो ती मालिका ४-१ अशी जिंकला.
मकरंद भोंसले
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : www.mavipa.org