आज संपूर्ण जगाला हवामान बदलाचे चटके सोसावे लागत आहेत. जंगलांना लागणारे वणवे, प्रलयंकारी वादळे, भेडसावणारे महापूर आणि नको तितके वाढणारे तापमान अशा आपत्तींमुळे जनजीवन तर विस्कळीत होतेच, पण अर्थव्यवस्थाही कोलमडते. अशा वेळेस हवामान बदलाचा इतिहास समजून घेण्यासाठी आणि भविष्यातल्या हवामान बदलाचा कल कसा राहील याचा अंदाज घेण्यासाठी एका विशिष्ट गटातल्या सागरी सूक्ष्मजीवांचे जीवाश्म मार्ग दाखवू शकतात.
सूक्ष्मजीवांचा हा गट म्हणजे छिद्रधारी संघातले सजीव होत. आकाराने अत्यंत सूक्ष्म असूनही ते आपल्या चिमुकल्या देहावर कवच निर्माण करतात. प्रवाळांच्या वसाहतींमध्ये, खाड्यांमध्ये समुद्रातल्या ऐन पाण्यात किंवा अगदी सागरतळाशी वेगवेगळ्या खोलीवर अशा विविध अधिवासात हे सूक्ष्मजीव संपूर्ण जगभरात आढळतात. त्यांच्या जीवाश्मांच्या अभ्यासावरून खडकांचे वय अचूक काढता येते. पेट्रोलियमच्या अन्वेषणातही त्यांचा अभ्यास उपयोगी पडतो. पण विशेष म्हणजे त्यांच्या जीवाश्मांचा अभ्यास तापमानवाढीचा अंदाज घेण्यासाठीही उपयुक्त ठरला आहे.
या संघातले सूक्ष्मजीव कॅम्ब्रियन नावाच्या कालखंडाच्या सुरुवातीला, म्हणजे साडेचौपन्न कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर अवतीर्ण झाले. विविध कालखंडात आढळणाऱ्या अनेक प्रजातींच्या अभ्यासांतून छिद्रधारी संघातल्या सजीवांची सतत उत्क्रांती होत असते हे सिद्ध झाले आहे. या संघातल्या सूक्ष्मजीवांच्या कवचांमधल्या कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण समुद्राच्या पाण्याच्या तापमानानुसार बदलते, हे रासायनिक चाचण्यांवरून निष्पन्न झाले आहे. पाण्याचे तापमान वाढल्यावर मॅग्नेशियमचे प्रमाण वाढते. या माहितीच्या आधारे सागरतळाशी साठलेल्या अवसादांच्या थरांमधल्या छिद्रधारींच्या जीवाश्मांच्या अभ्यासावरून एखाद्या ठिकाणी भूतकाळात तापमानबदल कसकसे होत गेले याचा आलेख मिळू शकतो.
खनिजतेला अन्वेषणासाठी आणि उत्पादनासाठी आणि अन्य अनेक कारणांसाठी, विंधनविहिरी खोदल्या जात असतात. त्यातून भूगर्भातल्या खडकांच्या थरांची माहिती मिळते. प्रत्येक थरातून निघालेल्या खडकांच्या नमुन्यांमधल्या या जीवाश्मांचे परीक्षण केले जाते. त्यावरून प्रत्येक कालखंडाचे वयही समजते आणि त्या कालखंडात एखाद्या ठिकाणचे तापमान किती होते तेही सांगता येते. गेल्या सहा-सात हजार वर्षांत, हवामानात कसे बदल घडत गेले याचा हल्ली अनेक ठिकाणी अभ्यास सुरू आहे. समुद्रतळाशी साठणाऱ्या अवसादांमधल्या जीवाश्मांमध्ये कसकसे बदल होत गेले, त्यावरून तापमानातल्या वाढीचे आलेख तयार केले जातात. त्या आलेखांवरून नजीकच्या भविष्यकाळात हवामान कसे बदलत जाईल, याचे अनुमान काढता येते. हवामान बदलाने धोक्याची पातळी गाठल्याने या संशोधनास अनन्यसाधारण महत्त्व आले आहे.
– डॉ. श्वेता चिटणीस
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org