सीमित कार्यांचा संच अचूकपणे पूर्ण करण्यासाठी गणितीय तर्कबुद्धीच्या साहाय्याने मर्यादित कृत्रिम बुद्धिमत्तेची प्रणाली तयार केली जाते. मानवी बुद्धिमत्तेचे प्रारूप तयार करून यंत्राला विशिष्ट कार्यपूर्तीसाठी प्रशिक्षित केले जाते. प्रणालीमधील पूर्वनियोजित पायऱ्यांचे तंतोतंत पालन केल्यामुळे नेमून दिलेले कार्य करताना क्रमभंग होण्याची शक्यता नसते.
दैनंदिन जीवनात मर्यादित कृत्रिम बुद्धिमत्तेचे उपयोजन व्यावहारिक पातळीवर अनेक ठिकाणी केल्याचे आढळते. त्यापैकी काही निवडक सोबतच्या आकृतीत दिले आहेत. अमॅझॉनचे ॲलेक्सा, ॲपलचे सिरी यासारखे भाष्य-अभिज्ञानी, आणि गुगल ट्रान्सलेटसारखा भाषानुवाद करणारा आभासी मदतनीस हे कृत्रिम बुद्धिमत्तेचे सर्वोत्तम अनुप्रयोग समजले जातात. आपल्या प्रश्नांना अचूक उत्तर देण्याचा त्यांचा वेग आश्चर्यकारक आहे. परंतु गोंधळात टाकणाऱ्या प्रश्नांना असंबद्ध उत्तर मिळाल्यावर त्यांच्या मर्यादा आपल्या लक्षात येतात.
हेही वाचा >>> कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेची मर्यादित क्षमता
शिफारस इंजिनची प्रणाली आपली आवड ओळखून गाण्यांचा अल्बम तयार करते किंवा मालिका आणि चित्रपटांची संभाव्य यादी करते. मात्र प्रत्येक क्षेत्रासाठी वेगळी शिफारस इंजिनची प्रणाली वापरावी लागते. गुगल आणि तत्सम शोध-इंजिन, त्यांच्या विशाल पूर्वसंचित माहितीसाठ्यातून आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधून काढतात. आपण टंकित केलेल्या संकेत-शब्दांबद्दल अधिक माहितीचे अब्जावधी दुवे, मर्यादित कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे अर्ध्या ते एक सेकंदात हजर करतात. एका प्रश्नाला केवळ एका नाही, तर हजारो संभाव्य उत्तरांच्या संकेतस्थळांची यादी काही क्षणांत प्रदर्शित केली जाते. त्याचा क्रम वाचकांच्या प्राधान्यक्रमांनुसार बदलत असतो.
मर्यादित कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने मानवी चालकाविना वाहने चालवणे शक्य होत आहे. परंतु मर्यादित कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये मानवी मेंदूसारखी संज्ञानात्मक क्षमता नसल्यामुळे सुरक्षितपणे वाहन चालवण्यासाठी रस्त्यावरील अनपेक्षित परिस्थिती किंवा धोक्याबद्दल प्रशिक्षण देणे आव्हानात्मक आणि जिकिरीचे असते.
संचयित माहितीचे परीक्षण करून संभाव्य परिणामांचा अंदाज करण्यासाठी आणि निष्कर्ष काढण्यासाठी मर्यादित कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली जात आहे. यंत्रात होणारा बिघाड स्वतः यंत्रच भविष्यसूचक विश्लेषणाच्या आधारे मनुष्याच्या निदर्शनास आणून देऊ शकते.
कृत्रिम बुद्धिमत्ता मर्यादित असली तरी शक्तिशाली नाही, असा अर्थ होत नाही किंबहुना अनेकदा मनुष्यापेक्षा अधिक क्षमतेने कार्य पूर्ण करू शकते. कृत्रिम बुद्धिमत्ता मर्यादा सूचित करणारी असली तरी आपल्या भोवतालच्या विश्वात तिने शिरकाव केला आहे आणि सहजपणे आपण मर्यादित कृत्रिम बुद्धिमत्तेला आपल्या जीवनात स्थान देऊन सामावून घेतले आहे.
वैशाली फाटक-काटकर
मराठी विज्ञान परिषद
ईमेल: office@mavipa.org
संकेतस्थळ: http://www.mavipa.org