भूवैज्ञानिक कालमापन प्रणाली (जिऑलॉजिकल टाइम स्केल) म्हणजे भूवैज्ञानिक घटना आणि त्यांचा काळ यांचा सहसंबंध होय. इतिहासाच्या पुस्तकातून ज्याप्रमाणे वेगवेगळ्या काळात घडलेल्या घटना आपल्याला ज्ञात होतात, अगदी त्याचप्रमाणे भूवैज्ञानिक कालमापन प्रणालीतून पृथ्वीची निर्मिती झाल्यापासून ते अगदी अलीकडच्या काळापर्यंत पृथ्वीवर घडलेल्या वेगवेगळ्या भूवैज्ञानिक घटना घडण्याच्या नेमक्या कालखंडाची माहिती मिळते.
बायबलचा आधार घेऊन पृथ्वीचे वय सहा ते सात हजार वर्षे इतके आहे, असे सांगण्यात येत होते. भूवैज्ञानिकांना मात्र ते काही लाख वर्षे असावे असे वाटत होते. खडक आणि जीवाश्म यांच्यावर केलेल्या संशोधनावरून विश्वसनीय कालमापन करण्याचे प्रयत्न अठराव्या शतकाच्या अखेरीस सुरू झाले. १९१३ मध्ये ब्रिटिश भूवैज्ञानिक आर्थर होम्स यांनी पहिल्यांदा सर्वसमावेशक भूवैज्ञानिक कालमापन प्रणाली संकलित केली. नंतर तंत्रज्ञानाच्या प्रगतीनुसार त्यात सुधारणा होत गेल्या. १९व्या शतकाच्या सुरुवातीला विल्यम स्मिथ, जॉर्ज क्युविए, ज्यां द’हॅलोइ, अॅलेक्जॅंडर ब्राँग्निआर्त, इ. वैज्ञानिकांनी जीवाश्मांच्या आधारे एकाच कालखंडात निर्माण झालेले खडक कसे ओळखता येतात, हे दाखवून दिले.
हेही वाचा >>> कुतूहल: पुराजीवविज्ञान संस्थेचे संस्थापक
पुढे कालमापनात जीवाश्म कळीची भूमिका बजावू शकतात, हे वैज्ञानिकांच्या लक्षात आले. कारण विशिष्ट प्रजाती या विशिष्ट प्रकारच्या हवामानात आणि प्रदेशातच आढळून येतात, तसेच त्यांच्यात काळाच्या ओघात उत्क्रांती होत असते. यावरून एका प्रदेशातील खडकात सापडणाऱ्या जीवाश्मांची तुलना इतर प्रदेशातील खडकात सापडणाऱ्या जीवाश्मांशी करून त्यांचे वय निश्चित करणे आणि अशा तऱ्हेने विशिष्ट प्रदेशांचा आणि त्यावरून संपूर्ण पृथ्वीचा इतिहास शोधून काढणे सोपे झाले.
खडक कधी निर्माण झाला हे ठरवण्यासाठी वापरला जाणारा दुसरा निकष म्हणजे किरणोत्सारी खनिजांमधून होणारे उत्सर्जन. या पद्धतीमुळे खडकाचे वय खूप नेमकेपणाने मिळते. ही पद्धत नि:संदिग्ध वय (अब्सोल्यूट एज) दर्शवते.
भूवैज्ञानिक काळ चार युगांमध्ये विभागलेला आहे. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून, म्हणजे ४६० कोटी वर्षांपासून ते ४०० कोटी वर्षांपर्यंतच्या काळाला अवपातालिक (हेडीयन) युग म्हणतात. या ६० कोटी वर्षे कालावधीमध्ये तापमान प्रचंड असल्याने पृथ्वीवर सजीव अस्तित्वात नव्हते. त्यानंतरच्या १५० कोटी वर्षांच्या कालखंडाला आर्ष युग म्हणतात. या कालखंडात कदाचित काही सूक्ष्मजीव अस्तित्वात असावेत, पण त्याचा ठोस पुरावा मिळालेला नाही. त्यानंतरच्या १९६ कोटी वर्षांच्या कालखंडात उत्क्रांतीच्या प्राथमिक टप्प्यातले सजीव आढळतात. त्या कालखंडाला प्रपुराजीव कालखंड म्हणतात. आणि सगळ्यात अलीकडचा कालखंड ५४ कोटी वर्षांपूर्वी सुरू झाला, आणि अद्यापि सुरू आहे. या कालखंडात विविध सजीव उत्क्रांत झाले.
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org