आशिष महाबळ
आपण नकाशे कसे वापरतो आणि ते वापरून एका जागेवरून दुसऱ्या जागेवर कसे जातो यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे क्रांतिकारक बदल घडताहेत. सुधारित जीपीएसमुळे प्रवास सुकर तर झाला आहेच, पण त्यावर आधारित नकाशे स्मार्ट झाल्याने हव्या त्या गोष्टींबद्दलच्या तुमच्या आवडींना अनुरूप शिफारसी मिळू शकतात. इथे स्मार्ट नकाशे म्हणजे तुम्हाला हवी असलेली माहिती स्वत:हून पुरवणारे नकाशे. आपण प्रवासाच्याच नाही तर दैनंदिन नियोजनासाठीही डिजिटल नकाशांवर अधिकाधिक अवलंबून आहोत. या प्रणालींमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा केला जातो हे समजून घेतल्यास त्यांचा अचूक वापर करण्यास तसेच त्यामधली कमतरता ओळखण्यास मदत होऊ शकते.
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मार्ग नियोजनात लक्षणीय सुधारणा झाली आहे. स्मार्ट वाहतूक प्रणाली सेकंदागणिक सद्या:परिस्थितीवर आधारित सर्वोत्तम मार्ग सुचवतात. यात वाहतुकीची परिस्थिती, हवामान आणि रस्त्याच्या परिस्थितीचे विश्लेषण अशा सर्व गोष्टी येतात. अशा सूचना आपसूक मिळत असल्यामुळे चालकांचा वेळ वाचतो आणि ताण कमी होतो. तथापि, अशा प्रणालींना फसवणे अशक्य नाही. संदेशवहनात दुसऱ्या संदेशांनी बाधा आणणे, जॅमिंग करणे किंवा खोटे संदेश पाठवणे अशा बऱ्याच शक्यता आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने अशा धोक्यांचा प्रतिकार करू शकणाऱ्या अधिक कणखर प्रणाली विकसित करणे सुरू आहे.
हेही वाचा :कुतूहल: स्मार्ट परिधानियांचे भविष्य
प्रत्येकाच्या आवडी, सवयी आणि प्राधान्यांनुसार नकाशे बनवणे कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सोपे झाले आहे. तुम्ही आधी भेट दिलेल्या जागांवरून तुम्हाला जवळपासचे रेस्टॉरंट, पर्यटनस्थळे नकाशावर आपसूक कळतात. तुम्ही भेट दिलेल्या जागांचे नकाशे, एखाद्या ठिकाणी किती वेळा जेवला आहात आणि कधी, ही सर्व माहिती सहजी मिळते. तुमच्या वाहन चालनाच्या सवयीनुसार तुम्हाला मार्ग आखून मिळू शकतात. रस्त्यातल्या वाहतूक पोलिसांबद्दलची माहितीपण नकाशात दिसते. अद्यायावत गाड्यांमधील नकाशांमध्ये पार्किंगच्या जागांची माहिती तर असतेच पण तिथे मोकळ्या जागा आहेत का हे पण कळू शकते.
कृत्रिम बुद्धिमत्ता-संचालित नकाशे वादळे, पूर, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींच्या वेळी मिनिटांगणिक बदलत्या परिस्थितीचा आढावा देत असतात. याचा फायदा संकटात सापडलेल्या लोकांना तर होतोच पण त्यांना आवश्यक असलेल्या मदतीच्या तैनातीसाठी पण होतो. आधी येऊन गेलेल्या अशा घटनांच्या विदेवरून कुठे जास्त मदत लागू शकते याची तजवीज नियोजकांना करून ठेवता येते.
हेही वाचा :कुतूहल: स्मार्ट परिधानीय (स्मार्ट वेअरेबल्स)
उपग्रहांद्वारे मिळालेल्या प्रतिमांचे विश्लेषण करून जंगलतोड, शहरांचा वाढणारा पसारा, हवामान बदलाचे परिणाम यासारख्या बदलांचा मागोवा अशा नकाशांनी घेता येतो. वन्यजीवांच्या हालचाली व त्यांच्या संवर्धन प्रयत्नांसाठी हे महत्त्वपूर्ण ठरते.
आशिष महाबळ
मराठी विज्ञान परिषद
ईमेल – office@mavipa.org
संकेतस्थळ – http://www.mavipa.org