आशिष महाबळ
काही दशकांपूर्वी मनगटावर घालायच्या काट्यांच्या घड्याळ्यांची जागा इलेक्ट्रॉनिक घड्याळ्यांनी घेतली. यात कॅलेंडर, स्टॉपवॉच, इतर देशांमधल्या वेळा दिसणे अशा सोयी होत्या. त्यानंतर सेलफोन आले आणि अनेकांनी वेगळे घड्याळ बाळगणे बंद केले. काही वर्षांपूर्वी मात्र अनेकांच्या मनगटांवर घड्याळे किंवा फिट-बिटसारखे पुन्हा झळकू लागले. हे कृत्रिम बुद्धिमत्तेचे पहिले चुणचुणीत परिधानीय अर्थात स्मार्ट वेअरेबल्स होत. स्मार्ट का, तर यातली काही घड्याळाची कार्ये तर करतातच, पण त्यासोबत तुमची ईमेल, फोनवरचे संदेश, आणि स्लॅक, व्हॉट्स अॅपसारख्या संदेशांची देवाण-घेवाणही करतात. त्याशिवाय तुमच्या हृदयाचे ठोके, दैनिक दशसहस्रापावलीच्या किती जवळ पोचलात याची नोंद वगैरे ठेवते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वास्थ्यसाथी: हे कृत्रिम बुद्धिमत्तेचे परिधानीय तुमच्या हृदयाचे ठोके कमी किंवा जास्त झाल्यास तुम्हाला सूचित करतात, तुमच्या झोपेचा आकृतिबंध कसा आहे ते दाखवतात (पुरेशी आहे की नाही वगैरे). आता तर सतत रक्तचाचणी करणारी अगदी छोटी पातळ यंत्रे दंडावर बाहीच्या आत परिधान करता येतात. या यंत्रांची विदा लगोलग तुमच्या फोनवरच नाही तर कृत्रिम बुद्धिमत्तासज्ज घड्याळांवरही दिसते. तुम्ही सरळ प्रश्नोत्तरांद्वारे त्यांच्याशी संवादही साधू शकता. समाजाचा एक भाग स्वास्थ्याबद्द्ल जास्त जागरूक होतो आहे. अशा सर्व लोकांना या घडाळ्यांमुळे त्यांच्या सवयींमुळे योग्य वेळी योग्य बदल करणे शक्य झाले आहे.

हेही वाचा : कुतूहल : बीएआरसी आणि टीआयएफआर

u

काही महिन्यांपूर्वी एका तलावाच्या काठी फिरताना बर्फामुळे घसरड्या झालेल्या वाटेवरून एका वृद्धेचा पाय घसरला. तिच्या स्मार्ट घड्याळातल्या अॅक्सलरोमिटरने तो अचानक झालेला बदल हेरला आणि अलार्म सुरू केला. त्यामुळे आजूबाजूचे लोक लगेच तिच्याजवळ पोचू शकले. याचप्रमाणे सुरक्षेसाठी इतरही सुविधा असतात. तुम्ही तुमच्या घड्याळाला नियमित ‘‘चेक-इन’’ करणार असल्याबद्दल सूचित करू शकता. ठरावीक कालावधी उलटल्यावर जर तुम्ही तसे केले नसेल तर त्यातील पत्तापुस्तिकेतल्या इमर्जन्सीला (यात तुम्ही ठरवलेले तुमच्या आप्तांचे क्रमांक असतात) थेट संपर्क करण्यात येतो. त्याचबरोबर देशानुरूप ९११ किंवा १०० डायल होते.

हेही वाचा :  कुतूहल : पारदर्शी कृत्रिम बुद्धिमत्तेचे उपयोजन

आवश्यक त्या सूचना योग्य वेळी करून देणे अशा अंगवळणी पडलेल्या गोष्टीव्यतिरिक्त गूगल-गॉगलसारख्या साधनांमुळे डोळ्यांना दिसणाऱ्या वस्तूंची जास्त माहिती कळू शकते उदा. किंमत, त्यात काही धोकादायक आहे का, समोर व्यक्ती असल्यास त्याचा मूड कसा आहे वगैरे. पण अशा सोयींमुळे गोपनीयतेचे अनेक गहन प्रश्नही निर्माण होतात.

आशिष महाबळ

मराठी विज्ञान परिषद

ईमेल – office@mavipa.org

संकेतस्थळ – http://www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta kutuhal article on smart wearables css