कृत्रिम बुद्धिमत्ता जागतिक तापमानवाढीच्या प्रश्नाला सामोरे जाण्याचा मार्ग दाखवते हे आपण आधीच्या लेखात बघितले. मात्र या मार्गावर चालण्याची किंमत मोजावी लागते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हा सद्या:स्थितीत जागतिक तापमानवाढीच्या प्रश्नाला अधिक बिकट करतो आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या यंत्रणेला प्रशिक्षण देण्यासाठी, कार्यरत ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा लागते, ज्यामुळे कर्बवायूच्या उत्सर्जनात लक्षणीय भर पडते. उदाहरणार्थ चॅट-जीपीटी ३ ला प्रशिक्षण देताना ५५२ टन कर्बवायूचे उत्सर्जन झाले (‘नेचर’मध्ये २०२४ साली प्रकाशित शोधनिबंध). त्याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दैनंदिन वापरातही मोठ्या प्रमाणात ऊर्जा खर्च होते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे गूगलचे सरासरी कर्बवायू उत्सर्जन ५० टक्क्यांनी वाढले आहे (गूगलचा २०२४ सालचा अहवाल). चॅट-जीपीटीच्या प्रत्येक वापरासाठी गूगलच्या तुलनेत १० पटींहून अधिक ऊर्जा लागते असा अंदाज आहे. त्याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सर्व्हर्सचे तापमान मर्यादित ठेवण्यासाठी पाण्याचा वापर केला जातो. चॅट-जीपीटीला प्रशिक्षण देण्यासाठी सात लाख लिटर्स पाण्याचा अपव्यय झाला. सामान्य व्यक्तींच्या चॅट-जीपीटीच्या वापरासाठी प्रत्येक वेळी अंदाजे अर्धा लिटर पाण्याचा अपव्यय होतो असा अंदाज आहे. दुसरीकडे कृत्रिम बुद्धिमत्तेची यंत्रणा चालवणाऱ्या मोठ्या डेटा सेंटर्सची ऊर्जा, पाण्याची गरज प्रचंड असते. ग्राहकांना विनाव्यत्यय सेवा पुरवण्यासाठी असे डेटा सेंटर्स अव्याहत कार्यरत असतात. गोल्डमन सॅक्सने २०२४ साली प्रकाशित केलेल्या अहवालानुसार कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे डेटा सेंटर्सची ऊर्जेची गरज १६० टक्के वाढेल आणि कर्बवायू उत्सर्जन दुप्पट होईल असा अंदाज आहे. शास्त्रज्ञांच्या इशाऱ्यानुसार जागतिक तापमानवाढीला १.५ सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्यासाठी २०३० सालापर्यंत कर्बवायूचे उत्सर्जन ४५ टक्क्यांनी कमी करावे लागेल. कृत्रिम बुद्धिमत्तेची वाढती ऊर्जेची गरज या ध्येयात अडथळा निर्माण करते आहे. कर्बवायू उत्सर्जन कमी करण्यासाठी शाश्वत ऊर्जा स्राोतांचा वापर वाढवणे आवश्यक आहे. पण ज्या गतीने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जगभर उद्याोगांच्या सर्व क्षेत्रांमध्ये वाढतो आहे त्या गतीने शाश्वत ऊर्जेचा पुरवठा वाढवणे नजीकच्या भविष्यात शक्य नाही. कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या शोधप्रबंधानुसार डेटा सेंटर्सच्या पाण्याचा वापर २०२७ सालापर्यंत १७०० अब्ज गॅलन्स इतका वाढेल. एकीकडे जगात अनेक ठिकाणी पाण्याच्या कमतरतेचा प्रश्न बिकट होतो आहे, त्यात कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी पाण्याच्या मागणीची भर पडते आहे. येत्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेची उपयुक्तता आणि त्याची पर्यावरणीय किंमत यांचा समतोल राखणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta kutuhal artificial intelligence and environmental challenges amy