सन १९८० च्या सुमारास ‘विचार करणारे यंत्र’ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू झाले. हळूहळू प्रत्येक कामात मानवाऐवजी यंत्रे दिसू लागतील असा समजही दृढ होत गेला. या प्रस्थापित होत असलेल्या विचाराला छेद देणारे व एक नवा युक्तिवाद मांडणारे विचारवंत म्हणजे जॉन सर्ल. १९३२ साली जन्मलेले जॉन सर्ल यांचे भाषाशास्त्र, मानसशास्त्र आणि समाजशास्त्र आदी विविध विषयांवर विशेष प्रभुत्व आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘कृत्रिम बुद्धिमत्तासुद्धा मानवाप्रमाणे आकलन करू शकणार नाही’ असे प्रवाहाविरुद्धचे मत सर्ल यांनी ठामपणे मांडले. उत्कृष्ट व मानवी संवेदनांशी मिळतीजुळती संगणक प्रणाली बनवली तरी त्यात मन,

आकलन आणि चेतना यांचा अभाव असतोच असे सर्ल यांचे मत होते हा विचार सिद्ध करण्यासाठी त्यांनी एक वैचारिक प्रयोग केला. तो ‘चायनीज रूम आग्र्युमेंट’ या नावाने प्रसिद्ध झाला आहे.

चायनीज रूम आग्र्युमेंट?

कल्पना करा की चिनी भाषा समजत नाही, अशा व्यक्तीला एका खोलीत ठेवले आहे. चिनी चिन्हे हाताळण्यासाठी इंग्रजीमध्ये सूचनांचा संच आहे. त्या व्यक्तीला दारातील फटीद्वारे चिनी भाषेत प्रश्न बाहेरून पोहोचवले जातात. सूचना संचात दर्शवलेल्याप्रमाणे प्रत्येक अक्षराचे प्रत्युत्तर पाहून ती व्यक्ती फटीतून योग्य उत्तर बाहेर पाठवते. बाहेरून पाहणाऱ्यास असे दिसते, की आतील व्यक्तीला चिनी भाषा समजते आणि ती प्रश्नांची उत्तरे देण्यास सक्षम आहे, परंतु प्रत्यक्षात, ती व्यक्ती चिन्हांचा अर्थ न समजता फक्त सूचनांचे पालन करत आहे.

या प्रयोगाद्वारे सर्ल असा दावा करतात की एखादी मानवी आकलनाचे/ संभाषणाचे अनुकरण करणारी चॅटबॉटसारखी संगणक प्रणाली जरी मानवी भाषेत प्रत्युत्तर देऊ शकत असली तरीदेखील तिला त्या भाषेचा अर्थ काही समजत नाही. मात्र कृत्रिम बुद्धिमत्ता काही काळातच भाषेची अचूक नक्कल करण्याबरोबरच तिचे व्यवस्थित आकलनही करू शकेल, याची नांदी हळूहळू दिसू लागली आहे. अर्थात संगणक आणि माणूस यांच्या संरचनेत जो मूलभूत फरक आहे त्यानुसार संगणकाचे आकलन आणि मानवी आकलन यात मूलभूत फरक आहे आणि भविष्यातही तो राहणार हे नक्की.

जॉन सर्ल यांनी अनेक पुस्तके लिहिली, त्यातील काही महत्त्वाची अशी आहेत. मानवी संस्कृती व भाषेतील अभिव्यक्तीची मांडणी (२०१०), मनाचा पुनशरेध (१९९२), मानवी क्रियेतील तर्कशुद्धता (२००१), मन आणि मानसिकताविषयी तार्किकता (१९९३) आणि सामाजिक वास्तविकतेची बांधणी इत्यादी. 

(जॉन सर्ल)

– कौस्तुभ जोशी ,मराठी विज्ञान परिषद

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta kutuhal artificial intelligence and john searle amy
Show comments