कृत्रिम बुद्धिमत्तेचा जन्म हा गणितातील लीनिअर अल्जिब्रा, फंक्शनल अॅनालिसीस आणि न्यूमरिकल अॅनालिसीस, या तीन शाखांमधील ज्ञानाच्या संयोगातून झाला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेला संभाव्यता आणि संख्याशास्त्र यांचा अत्यंत महत्त्वाचा आधार आहे. प्रचंड माहिती सुयोग्यरीत्या साठवणे, हवी असलेली माहिती वेगात मिळवणे आणि त्यावर प्रक्रिया करून आलेले उत्तर साठवणे यासाठी सारिणीचा (मॅट्रिक्स) उपयोग केला जातो. सारिणी म्हणजे, माहिती साठवलेले एकावर एक ठेवलेले कागद आणि एका कागदावरील कोणतीही माहिती कुठल्याही कागदावरील माहितीशी जोडणे शक्य आहे अशी रचना. सारिणीवर एकत्रित क्रिया करता येतात. विविध माहिती संचातील परस्परसंबंध विविध सारिणीतील संबंधांच्या साहाय्याने मांडता येतात.

मनुष्याच्या मेंदूमध्ये न्यूरॉनचे जाळे असते. अनेक जाळी एकमेकांशी जोडलेली असतात. दोन जवळच्या जाळ्यांमधील न्यूरॉनचे एकमेकांशी संदेश दळणवळण सुरू असते. अशी लाखो न्यूरल जाळी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीत असतात. इतक्या संख्येने जाळी, त्यांच्यातील दुवे आणि रचना, सारिणींमध्ये किंवा अन्य कोणत्या रचनेत कसे बसवता येतील या विषयी संशोधन सुरू आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सखोल शिक्षण कार्यप्रणालीसाठी नेमके गणिती नियम अद्याप शोधता आले नाहीत. या दिशेने गणित संशोधन जोमाने चालू आहे. आज आपण बहुविध संवेदना एकाच वेळी ग्रहण करून त्यांचा परस्पर संबंध जुळवून विचार करू शकेल अशी प्रणाली तयार करू शकलेलो नाही. मात्र वेगवेगळ्या प्रणाली जुळवून, अधिक सुसूत्रपणे संगणक वापरून आणि नेमके हे मानवी मेंदूत कसे होते ते समजून घेऊन ह्यूमनॉइड निर्मितीचे प्रयत्न सुरू आहेत. हे प्रयत्न कसे करावेत, कोणत्या प्रकारे प्रणाली तयार केली तर अपेक्षित उत्तर मिळेल, याचे उत्तर व आराखडा गणितातील मूलभूत संशोधनाने स्पष्ट होईल.

हेही वाचा >>> कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने निर्णयांची अंमलबजावणी

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ग्राफ थिअरी मिळून आधुनिक समाजाला भेडसावणाऱ्या काही समस्या सोडवणे नजीकच्या भविष्यकाळात शक्य आहे. उदाहरणार्थ, सोशल मीडियावरून केली जाणारी निंदा-नालस्ती, बदनामी, विचित्र खोटी छायाचित्रे यांना प्रतिबंध करता येईल. कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारे रखवालदार तयार करावयाचे संशोधन उपयुक्त ठरत आहेत. अर्थातच सायबर गुन्ह्यांनाही अटकाव करणे शक्य होईल.

अॅडम वॅगनर या तेलअविव विद्यापीठातील संशोधकाने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने ग्राफ थीअरीमधील भाकिते खोटी असल्याचे दाखवले. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता निर्मित टीएक्स ग्राफिटीप्रणालीद्वारे गणितात संशोधन शक्य होत आहे. गणितातील संशोधनाच्या पायावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास झाला आणि आता कृत्रिम बुद्धिमत्ता गणिताच्या ज्ञानात भर घालत आहे.

ईमेल– office@mavipa.org

आभा बर्वे-दीक्षित

मराठी विज्ञान परिषद

सकेंतस्थळ: http://www.mavipa.org