कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रात जगातील इतर विकसित देशांबरोबरच भारतही अग्रेसर आहे. भारतातील विविध शासकीय व खासगी संस्थांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर निरनिराळ्या प्रकारे शिक्षण, संशोधन, अभियांत्रिकी, वैद्याकीय कामासाठी केला जात आहे. भारतातील प्रमुख संस्था अशा-

भारतीय प्रोद्याोगिक संस्था (आयआयटी)- यामध्ये प्रामुख्याने आयआयटी दिल्ली (स्कूल ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स), आयआयटी बॉम्बे (सेंटर ऑफ मशीन इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स), आयआयटी कानपूर (आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड रोबोटिक्स केंद्र), आयआयटी खरगपूर (आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर ऑफ एक्सलन्स), आयआयटी मद्रास (कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्स केंद्र) आणि भारतीय विज्ञान संस्था (आयआयएससी) बंगळुरु या कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्र शिक्षण क्षेत्रात संशोधन करणाऱ्या अग्रगण्य संस्था आहेत. याबरोबरच डेटा सायन्स आणि यंत्र शिक्षणामध्ये भारतीय स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट (आयएसआय) कोलकत्ता ही प्रतिष्ठित संस्था कार्य करत आहे. सी डॅक पुणे म्हणजेच सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स कम्प्युटिंगमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर महत्त्वपूर्ण काम केले जात आहे. परमाणु ऊर्जा आयोगाअंतर्गत येणाऱ्या भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र (बीएआरसी) तसेच टाटा मूलभूत संशोधन संस्था (टीआयएफआर) येथेसुद्धा कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाशी संबंधित संशोधन आणि वापर सुरू आहे. इथे हे तंत्रज्ञान वापरून रासायनिक क्रिया, संगणक आज्ञावली, वेळ नियंत्रित प्रक्रिया केल्या जातात.

संरक्षण क्षेत्रातील, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनमध्ये (डीआरडीओ) आपल्या सैन्यदलांसाठी उपयोगी अशा कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर संशोधन केले जाते. याबरोबरच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्राो) अंतराळ संशोधनासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. मैसूर येथील ‘सेंट्रल फूड टेक्नॉलोजिकल रिसर्च इंस्टिट्यूट (सी एफ टी आर आय) ही संस्था अन्नपदार्थाची गुणवत्ता व प्रक्रिया यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करत आहे.

खासगी क्षेत्रात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), विप्रो, सत्यम इत्यादी कंपन्या संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत. याशिवाय देशातील अनेक विद्यापीठे, महाविद्यालये यामधून डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता यासारखे अभ्यासक्रम व संशोधन प्रयोगशाळा या माध्यमातून नवीन मनुष्यबळ तयार केले जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधनामुळे बरीच जटिल आणि आव्हानात्मक कामे खूप कमी वेळात व जास्त अचूकतेने केली जातात.

अल्पना कुलकर्णी ,मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org