आपल्या मोबाइलमधील ‘व्हॉट्सॲप’ हे संगणकाऐवजी स्मार्टफोन, टॅबलेट यांसारख्या छोट्या उपकरणांवर वापरण्यासाठी विकसित केलेले सॉफ्टवेअर असून समाजमाध्यमांवर मनोरंजन, शिक्षण, उत्पादन जाहिरात, व्यवसाय इत्यादी गोष्टींबाबत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपण एकमेकांशी संवाद साधतो. जनरेटिव्ह तंत्रज्ञान वापरलेल्या व्हॉट्सॲपसारख्या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित मोबाइल ॲप्समुळे वापरकर्त्यांना वापर करताना अधिक चांगला अनुभव मिळू शकतो. त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञानातील सर्व घटक समाविष्ट केलेले असतात ज्यायोगे कार्यक्षमता वाढते, मौल्यवान वेळ वाचतो आणि व्यवहार सुलभ होतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> कुतूहल : लिखित संवाद कृत्रिम बुद्धिमत्ता

मोबाइल ॲप्समध्ये उच्चारओळख तंत्रज्ञान वापरल्याने मानवी संभाषण संगणकाला समजेल अशा प्रकारे रूपांतरित केले जाते. ग्राहकसेवेच्या उद्देशाने ॲप विकसित करताना नैसर्गिक भाषा प्रक्रिया तंत्रज्ञानाचा अंतर्भाव उपयुक्त ठरतो. विदेवर अवलंबून असणाऱ्या व्यवसायप्रेरित सूचना आणि अंदाज, तसेच वर्गीकरण करणे, भविष्यातील अंदाज व्यक्त करणे या गोष्टींसाठी सखोल शिक्षण हे यंत्र शिक्षणामधील तंत्रज्ञान फायदेशीर आहे. प्रतिमा ओळख तंत्रज्ञान हे मोबाइलमधील निवडलेल्या प्रतिमा शोधण्यासाठी आणि ओळखण्यासाठी संगणक दृष्टी वापरते. मोबाइल ॲप्सच्या प्रमाणीकरणासाठी बायोमेट्रिक तंत्रज्ञान मदत करू शकते. एखाद्याने संदेशातून अभिनंदन केले तर काय उत्तर द्यायचे यासाठी ते स्वयंचलित प्रतिसाद सुचविते. भाषांतर प्रणाली ताबडतोबपणे विविध भाषांत भाषांतर करण्यास सक्षम असते. सखोल शिक्षण वैयक्तिक अनुभवातून शिकून वापरकर्त्यांना आवडेल अशा उत्पादनांची, सामग्रीची शिफारस करते. भावना ओळख तंत्रज्ञानामुळे काही ॲप्स माणसाच्या मन:स्थितीनुसार संगीत ऐकण्याची शिफारस करू शकतात. स्मार्टफोनच्या फेस अनलॉकसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अल्गोरिदम व प्रतिमा ओळख तंत्रज्ञान वापरल्याने स्मार्टफोन अनलॉक करणे सोपे, जलद आणि सुरक्षित झाले आहे. यंत्र शिक्षण आणि सखोल शिक्षण अल्गोरिदमसह वर्धित कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यास मोबाइल सुरक्षिततेपुढची आव्हाने सौम्य करता येऊ शकतात. आधुनिक मोबाइल उपकरणांमधील कॅमेऱ्याच्या क्षमतेवर कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाने लक्षणीय परिणाम केला आहे. प्रगत प्रतिमा ओळख आणि प्रक्रियेद्वारे दृश्य, प्रकाश, परिस्थिती अशा विषयांवर आधारित कॅमेरा सेटिंग्ज अधिक परिपूर्ण व प्रभावी करता येतात, परिणामी उत्कृष्ट प्रतिमा गुणवत्ता मिळवता येते. विविध क्षेत्रांत कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित मोबाइल अॅप्स उपलब्ध आहेत आणि विकसित होत आहेत.

डॉ. सुनंदा ज. करंदीकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

सकेंतस्थळ : http://www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta kutuhal artificial intelligence based mobile apps zws
Show comments