क्रीडाविश्वातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा आणखी एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्रणा अंत:स्थापित (एम्बेड) केलेली खेळ उपकरणे. उदाहरणार्थ कृत्रिम बुद्धिमत्ता असलेला फुटबॉल, क्रिकेटची बॅट, बॉल किंवा टेनिसची रॅकेट. यामध्ये अशा उपकरणात कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्रणा आणि वेगवेगळे संवेदक (सेन्सर) बसवलेले असतात.
क्रिकेटच्या बॅटमध्ये बसवलेली यंत्रणा आणि संवेदक फलंदाजाने फटका मारताना किती वेगाने बॅट चेंडूवर आली, फटक्यात किती जोर होता, चेंडू नक्की कुठे मारला गेला इत्यादी गोष्टी सांगते तर क्रिकेटच्या बॉलच्या आत बसवलेली कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्रणा चेंडूचा स्विंग, स्पिन आणि वेग अशासारख्या गोष्टी नोंद करून सांगते. त्याचप्रमाणे फुटबॉलमध्ये अंत:स्थापित केलेली यंत्रणा खेळाडूने मारलेल्या प्रत्येक किकनंतर किंवा पासनंतर फुटबॉलच्या मार्गात कोणता बदल झाला, किकचा जोर किती होता, किकमुळे फुटबॉल किती स्पिन झाला इत्यादी गोष्टींचे विश्लेषण करून ती माहिती नोंद करते.
या उपकरणस्थित कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या यंत्रणांकडून मिळालेल्या तपशीलवार माहितीमुळे प्रत्येक खेळाडूच्या खेळाचे विश्लेषण होते, त्याच्या खेळातील कच्चे दुवे, बलस्थाने स्पष्टपणे कळून येतात आणि प्रत्येक खेळाडूसाठी व्यक्तिनिष्ठ (टेलर मेड) प्रशिक्षण कार्यक्रम आखता येतो आणि अंतिमत: खेळाडूचा आणि संघाचा खेळ उंचावण्यासाठी मदत होते.
खेळाडू आणि संघ यांना कृत्रिम बुद्धिमत्ता लाभदायक आहेच पण खेळाच्या मैदानावर अवघड परिस्थितीत आणि तणावाखाली काम करणाऱ्या पंचांसाठीही कृत्रिम बुद्धिमत्ता लाभदायक ठरत आहे. अनेकदा निर्णय घेणे खूप अवघड असते आणि सामन्याचा निर्णय त्यावर अवलंबून असू शकतो. पंचांसाठीही आता कृत्रिम बुद्धिमत्ता असलेली अॅप्स उपलब्ध आहेत. ती पंचांना योग्य निर्णय घेण्यात मदत करतात. उदाहरण घ्यायचे झाले तर कधी कधी क्रिकेटमध्ये पायचीत (एलबीडब्लू) देण्याचा किंवा धावचीत (रन-आउट) देण्याचा निर्णय पंचांसाठी कठीण ठरू शकतो. अशा वेळी क्रिकेटमध्ये स्निक-ओ-मीटर किंवा टेनिसमध्ये हॉक-आयसारखे कृत्रिम बुद्धिमत्ता अॅप पंचांना मदत करतात.
कोणत्याही खेळाचा मुख्य आधार म्हणजे प्रेक्षक. प्रत्येक खेळाडूचे हजारो लाखो चाहते म्हणजे फॅन असतात. यांना आपल्या लाडक्या खेळाडूबद्दल अधिकाधिक माहिती हवी असते. अशा फॅन्ससाठी पण आता कृत्रिम बुद्धिमत्ता अॅप्स आहेत. वर्धित वास्तव/ आभासी वास्तव (एआर/ व्हीआर), चॅटबॉट अशी माध्यमे वापरून कृत्रिम बुद्धिमत्ता आता चाहत्यांना त्यांच्या लाडक्या खेळाविषयी खेळाडूविषयी ताजी आणि खास माहिती देणे, जगाच्या पाठीवर कुठेही चाललेल्या खेळाचे संपूर्ण आणि विहंगम दर्शन देणे, इत्यादी खास अनुभव विविध माध्यमांवर उपलब्ध करून देते.
शशिकांत धारणे
© The Indian Express (P) Ltd