जागतिक स्थान प्रणाली अर्थात जीपीएसद्वारे (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम) आपल्याला हव्या असलेल्या ठिकाणाची माहिती दृश्य स्वरूपात पटलावर मिळते. विशिष्ट ठिकाण किती दूर आहे, तिथे जाण्यासाठी उपलब्ध मार्ग, लागणारा वेळ कळतो. या सुविधेमुळे संबंधित ठिकाणाचा पत्ता शोधणे, रस्त्यांचे नकाशे तयार करणे, जंगलांचा, झाडांचा शोध घेणे, वगैरे विविध कामे सुकर होतात. यातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या यंत्र शिक्षण तंत्रज्ञानाच्या वापरामुळे अचूकता आणि कार्यक्षमता वाढते. गूगल नकाशे (मॅप्स) वापरल्याने कोणाला पत्ता विचारण्याची गरज भासत नाही. उपग्रहांद्वारे आणि रस्त्यांवरील कॅमेऱ्यांमधून मिळालेल्या प्रतिमा यंत्र शिक्षण अल्गोरिदम आणि विदा प्रक्रिया तंत्रज्ञानासह प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता यात वापरली जाते.
हेही वाचा >>> कुतूहल – कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित मोबाइल ॲप्स
‘डॅल-ई’ हे नैसर्गिक भाषा प्रक्रियेचा वापर केलेले यंत्र शिक्षण प्रारूप आहे. ‘डॅल-ई’ वर्णन सांगितल्यावर त्याच्याशी जुळणारी प्रतिमा तयार करते. याला ‘टेक्स्ट टू इमेज’ प्रारूप म्हणतात. यात जनरेटिव्ह कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. अशी आणखी काही प्रारूपे उपलब्ध आहेत. शाळा-महाविद्यालयांत कृत्रिम बुद्धिमत्ता संचालित मानवी स्वरूपातील रोबॉट्स वर्गात प्रत्यक्ष शिकवितात. यात यंत्र शिक्षणाचा वापर केल्याने विचारलेली माहिती शोधून प्रतिसाद दिला जातो. तसेच हालचाली करताना लागणारी संगणक दृष्टीही असते. चेहऱ्यावरील हावभाव बदलणे, हस्तांदोलन अशासारखा दृश्य संवाद साधून विचारलेल्या प्रश्नांची ताबडतोब व अचूक उत्तरे मिळाल्याने रोबॉट्स शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होत आहेत.
प्रतिमा ओळख प्रणाली ही डिजिटल प्रतिमा आणि व्हिडीओमधील विशिष्ट वस्तू, आकृती, ठिकाणे वगैरे बाबी ओळखून, त्याचे विश्लेषण करून, प्रक्रिया करून कार्य करते. यात सखोल शिक्षण अल्गोरिदमचा उपयोग केला जातो. कारण ते गुंतागुंतीच्या न्युरल नेटवर्कचा वापर करते. स्वयंचालित वाहन म्हणजे चालकविरहित गाड्या रस्त्यावर अपघात न करता धावू शकण्यासाठी संगणक दृष्टी, प्रतिमा ओळखणे आणि सखोल शिक्षणाच्या संयोजनाचा वापर करतात. तसेच बायोमेट्रिकमध्ये बोटांचे ठसे व आधार कार्डातील छायाचित्र ओळखण्यासाठीही विदाचे विश्लेषण करून अचूक प्रतिमा ओळखता येते.
हेही वाचा >>> कुतूहल : लिखित संवाद कृत्रिम बुद्धिमत्ता
शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर हवामानाचा अचूक अंदाज वर्तविण्यासाठी, मातीच्या कसदारपणाचे विश्लेषण अशा गोष्टींसाठी केला जातो. यासाठी ड्रोन आणि कृत्रिम उपग्रहांकडून मिळालेल्या प्रतिमा तसेच शेतात निरनिराळ्या ठिकाणी लावलेल्या संवेदकांद्वारे मिळालेल्या माहितीचा उपयोग केला जातो. नंतर त्याचे विश्लेषण करून यंत्र शिक्षण व इमेज प्रोसेसिंगचा उपयोग करून पिकांचे परीक्षण व संरक्षणात्मक उपाययोजना करता येतात.
डॉ. सुनंदा ज. करंदीकर
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
सकेंतस्थळ : http://www.mavipa.org