महाराष्ट्राबरोबरच जगभर वन व वन्यजीवांचे संरक्षण करणाऱ्या यंत्रणा त्यांच्या संरक्षणासाठी प्रयत्नशील आहेत, परंतु तस्कर मंडळी त्यांच्यापेक्षा वरचढ ठरत आहेत. वन्य प्राण्यांची शिकार वाढीव प्रमाणावर होत आहे, वारेमाप अवैध वृक्षतोड होत आहे, अशा वेळी कृत्रिम बुद्धिमत्ता शासनयंत्रणेच्या दिमतीस येत आहे ही आनंदाची बाब आहे. स्वयंचलित ड्रोन, थर्मल इमेजिंग, यंत्र अध्ययन, संगणकीय दृष्टी असलेले बुद्धिमान कॅमेरे आणि विविध प्रकारचे संवेदक या अनेक साधनांनी वन अधिकारी सुसज्ज होत आहेत त्यामुळे त्यांना वन व वन्यजीवांचे संरक्षण करणे आता शक्य होणार आहे. ध्वनिमुद्रण करून त्यांचे वर्गीकरण करणारे विशिष्ट संवेदक असलेले साधन जिथे जिथे वृक्षतोड होते तिथे बहुतेक सर्व ठिकाणी वापरले जात आहे. वाघाची कातड्यासाठी, गेंड्यांची शिंगासाठी तर हत्तींची त्यांच्या दात किंवा सुळ्यासाठी कत्तल केली जाते, वनाधिकाऱ्यांकडे मर्यादित शस्त्रसाठा आणि मनुष्यबळ असते. त्यामुळे ते शिकारी थांबवू शकत नाहीत.

हेही वाचा >>> कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि विद्युत पुरवठा

वनात विविध ठिकाणी बसवलेले बुद्धिमान कॅमेरे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना मदत करत आहेत. या कॅमेऱ्यांच्या मदतीने व सतत फिरत असलेल्या ड्रोनच्या मदतीने संशयास्पद हालचाली टिपल्या जातात, शस्त्रांची ओळखही त्याद्वारे पटवली जाते. या साऱ्या माहितीनुसार ही साधने सतर्कतेचा इशारा वनाधिकाऱ्यांना देतात व त्यानुसार कार्यवाही करतात. विविध स्वरूपाचे संवेदक वनात बसवून त्यांच्याद्वारे सर्वच प्रकारच्या आवाजांची नोंद घेतली जाते. या नोंदीचे वर्गीकरण केले जाते. विविध प्राणी व पक्षी यांच्या आवाजाच्या अभ्यासावरून ते ओळखले जातात. बंदूक किंवा तत्सम शस्त्रांचा आवाज, करवत किंवा कुऱ्हाडीचा आवाज वाहनांचा आवाज, माणसाच्या बोलण्याचा आवाज, या सर्व आवाजांची नोंद केली जाते.

कृत्रिम बुद्धिमत्ता साधन वापरून या विविध आवाजांचे वर्गीकरण केले जाते व वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला जिथून हे आवाज आले त्या ठिकाणाची माहिती दिली जाते. या माहितीच्या आधारे अधिकारी अवैध वृक्षतोड किंवा प्राण्यांची शिकार रोखू शकतात. ‘पॉस’ नावाचे इंटेलिजंट अल्गोरिदम वनातील शिकारीच्या पद्धतीवरून पुढील कोणत्या भागात शिकार होऊ शकते किंवा शिकारी पुढचा सापळा कुठे आणि कसा लावतील याची आगाऊ माहिती देते. उपलब्ध माहितीनुसार ट्रेलगार्ड एआय नावाचा बुद्धिमान कॅमेरा एका अमेरिकन कंपनीने तयार केला असून त्याच्या साहाय्याने आफ्रिकेत सुमारे ३० शिकारी पकडण्यात यश आले आहे. आपल्याकडे कान्हा आणि पेंच अभयारण्यात ट्रेलगार्डची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.

– डॉ. किशोर कुलकर्णी

मराठी विज्ञान परिषद

इमेल: office@mavipa.org

सकेंतस्थळ : http://www.mavipa.org

Story img Loader