समुद्रविषयक खूप सारी माहिती निरनिराळ्या स्रोतांपासून मिळवली जाते. यात उपग्रह, संशोधन नौका आणि पाण्याखाली छायाचित्रण करणारी विविध उपकरणे यांचा वापर केला जातो. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्राने या माहितीचे विश्लेषण करून सागरी परिसंस्थेबद्दल आवश्यक माहिती मिळवता येते. विशेषत: हवामानाचे बदलते स्वरूप, समुद्र जल पातळीतील वाढ, चक्रीवादळ अथवा समुद्रात होणारे इतर बदल, अपायकारक शैवालामुळे होणारे अतिजैविकीकरण, अशा विविध बाबतींत वेळेआधीच अंदाज बांधता येतात. नैसर्गिक आपत्ती येण्याआधीच योग्य ते निर्णय घेऊन प्रतिबंधात्मक उपाय योजता येतात.
पर्यावरणातील अजैविक घटक जसे तापमान, क्षारता, पाण्याची गुणवत्ता, तसेच जैवविविधतेप्रमाणे असणारे जैविक घटक यांचे मोजमाप करणे हे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या यंत्र शिक्षण व सखोल यंत्र शिक्षण तंत्रव्यवस्थेने नियंत्रित पद्धतीत केले जाते. यामुळे संपूर्ण सागरी पर्यावरणाचे व्यवस्थापन करता येते. मानवनिर्मित धोक्यांपैकी प्रदूषण, तेल तवंग, बेकायदा मासेमारी अशा गोष्टीदेखील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विशेष विश्लेषणाने लक्षात घेता येतात. हे वेळेतच समजल्यामुळे सागरी जैवविविधता सुरक्षित राहून शाश्वत पद्धतीने मासेमारीदेखील करता येते. आजकाल बहुचर्चित असलेल्या ‘शाश्वत मत्स्योद्याोग व्यवस्थापन’ या विषयाबाबत कृत्रिम बुद्धिमत्तेचा खूप वापर करता येतो.
हेही वाचा >>> कुतूहल : समुद्रविज्ञान अभ्यासासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
महासागरातून निरनिराळ्या देशांत दळणवळण साध्य केले जाते. या सर्व व्यवस्थेला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाने अधिक सुरक्षित करता येते. या बाबतीतील अल्गोरिदम्स तयार केले गेले आहेत, जेणेकरून हवामानाबद्दलचे अंदाज, जहाजांची वाहतूक आणि त्याचे सुरक्षित मार्ग, त्याचप्रमाणे समुद्रविज्ञानाची विदा या बाबी आधीच लक्षात घेतल्या जातात. यामुळे समुद्रात होऊ शकणारे अपघात टाळता येऊ लागले आहेत. स्वयंचलित बोटींची वाहतूकदेखील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अल्गोरिदम्सप्रमाणे करण्यात येऊ लागली आहे. थोडक्यात, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने सागरी दळणवळण जास्त सुरक्षित झाले आहे. बदलत्या हवामानामुळे विविध नैसर्गिक आपत्ती सतत भेडसावत आहेत; परंतु कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने काही मॉडेल्स आणि सिम्युलेशन उपकरणे तयार केल्यामुळे अशा दुर्घटनांचा सामना करण्यासाठी आधीच सजगता निर्माण करता येते. प्रदूषके आणि त्यामुळे होणारी सागरी जीवांची हानी टाळता येते, असेही शास्त्रज्ञांना वाटते.
शासकीय धोरणे आखताना योग्य त्या ठिकाणी अशा प्रकारचे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञाने वापरल्यास मानवनिर्मित संकटांवर मात करता येईल. आर्थिक विकास साधण्यासोबतच महासागराचे संवर्धनही करणे शक्य होईल.
-डॉ.नंदिनी विनय दशमुख
मराठी विज्ञान परिषद
इमेल:office@mavipa.org
सकेंतस्थळ :http://www.mavipa.org