उपलब्ध निरीक्षणांच्या आधाराने संगती शोधणे, अशीच संगती असलेली निरीक्षणे शोधणे, आणि या सर्व निरीक्षणात नियमबद्धता आहे का? याचा शोध म्हणजे संशोधन अशी एक व्याख्या आहे. आजमितीस विविध जर्नलमधील, चर्चासत्रातील सर्व शोध निबंध वाचणे संशोधकाला व संशोधकांच्या गटालासुद्धा शक्य नसते. हा आशय डिजिटल स्वरूपात उपलब्ध असतो तो ‘वाचण्याची’, तसेच आशयातील विविध निरीक्षणे एकत्रित समोर आणणे, संभाव्य नियम सुचवणे ही कामे कृत्रिम बुद्धिमत्ता करू शकते. लार्ज लँग्वेज मोडेल आणि विविध क्रमबद्ध क्रियांचा, म्हणजेच अल्गोरिदमचा वापर करून हे शक्य होते. संशोधनासाठी प्राथमिक तयारी वेगात व अचूक होते.
हेही वाचा >>> कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ता : इस्राो आणि डीआरडीओ
फोटोंचे विश्लेषण करून आपण पावसाअगोदरचे, पाऊस पडतानाचे, नंतरचे, तसेच वादळापूर्वीची शांतता, वादळ भिडताना आणि वादळ गेल्यावर हवामान कसे आहे नोंदवतो. आर्द्रता, भूभाग प्रकार, विविध स्तरावरचे हवेचे विश्लेषण, वारा वेग दिशा, ढगांचे प्रमाण, उष्णता इ. घटकांची स्थिती काय होती याच्या नोंदी असतात. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने आपत्ती अगोदर जसे हवामान असते तसे हवामान तयार होत आहे का हे अचूक आणि खूप आधी ठरवता येते. हा माहिती संच आणि आपत्तीचे स्वरूप यातील नाते कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीला शिकवता येते. भविष्यात त्या प्रकारची हवामानाची स्थिती नोंदली गेल्यास, येऊ घातलेली आपत्ती, तिचे स्थान, तीव्रता, बाधित क्षेत्र इत्यादींची सूचना पुरेशी आधी देते. बाधित क्षेत्रातील सजीव कसे, कुठे हलवावेत, तेथील इमारती, धरणे कसे सुरक्षित ठेवता येतील याचा आराखडाच तयार करते. आपत्ती नजीकच्या भविष्यकाळातील असो किंवा दीर्घकालीन पर्यावरण ऱ्हासाची, दोन्हीसाठी ही पद्धत परिणामकारक आहे. पर्यावरण बदल आणि त्याचे परिणाम अत्यंत बारकाईने नोंदले जातात, खूप अधिक गुणधर्मांच्या साहाय्याने, संभाव्य उपाययोजना समाज आणि प्रशासन यांच्या समोर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने मांडता येतात. पुढच्या पिढीचे या हवामान बदलामुळे काय हाल होऊ शकतात हे या अभ्यासातून कळेलच मात्र त्यांचे भवितव्य सुरक्षित ठेवण्याचे मार्गसुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेने नेमकेपणाने मानवाला दाखवले आहेत. निवड आपली आहे.
(अ) कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली, (ब) निरीक्षणे, कृत्रिम बुद्धिमता देवाणघेवाण, (क) सद्या:स्थितीतील परिणाम (नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन) सोबतच्या आकृतीत दाखवले आहेत.
प्रा किरण बर्वे
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org