वणवा म्हणजे जंगलात किंवा डोंगरमाथ्यावर लागलेली अनियोजित व अनियंत्रित आग. रूक्ष हवामान, उच्च तापमान, वीज, ज्वालामुखी इत्यादी नैसर्गिक कारणांमुळे तसेच मानवाच्या निष्काळजीपणामुळे वणवे पेटतात. संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण परिषदेच्या अहवालाप्रमाणे हवामान बदलामुळे गेल्या पाच दशकांत वणव्यांचे प्रमाण पाच ते सहा पटींनी वाढले आहे. ही वाढ रोखण्यासाठी वणव्यांचा अंदाज व जनजागृती याला महत्त्व प्राप्त झाले आहे. काही विकसित देशांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून वणव्यांचा अंदाज व वणव्यांचे संभाव्य धोके टाळण्यासाठी त्यांचा मागोवा घेणारी यंत्रणा (ट्रॅकिंग सिस्टम) तयार केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> कुतूहल : आवडीतील साधर्म्यानुसार शिफारस

वणव्यांचा अंदाज, वणवे रोखण्यासाठीचे व्यवस्थापन आणि वणव्यांपासूनच्या धोक्याचे व नुकसानीचे व्यवस्थापन यांची योग्य वेळेत आणि योग्य गतीने सांगड घालणे आवश्यक असते. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता व यंत्र शिक्षण उपयुक्त ठरले आहे. वणव्यांच्या जागेचे भौगोलिक व भौतिक वैशिष्ट्य, तेथील तापमान, ऑक्सिजनचे व आर्द्रतेचे प्रमाण, आगीच्या ज्वाळांची गती इत्यादी घटकांची विदा वापरून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने वणव्यांचे प्रारूप तयार केले जाते. या प्रारूपाच्या साहाय्याने वणव्यांचा अंदाज व त्यांच्या मार्गासह नकाशे तयार केले जातात. यासाठी भूतकाळातील वणव्यांची विदा, डिजिटल नकाशे, अवकाशातील उपग्रह व जमिनीवरील कॅमेरे यांद्वारे मिळालेल्या प्रतिमा, सद्या:स्थितीतील हवामान, विविध संवेदक, इत्यादी विदा, योग्य गणनविधी (अल्गोरिदम) यांचा वापर केला जातो. विदांचे द्विअंकी वर्गीकरण (बायनरी क्लासिफिकेशन) व समाश्रयण (रिग्रेशन) करणारी सपोर्ट वेक्टर मशीन (एसव्हीएम) ही यंत्रशिक्षण गणनविधीसाठी वापरली जाते. लॉजिस्टिक रिग्रेशन या संख्याशास्त्रीय प्रारूपाचा वापर संगणकाच्या प्रायोजनांमध्ये (प्रोग्राम) बदलत राहणाऱ्या (व्हेरिएबल) घटकांच्या अंदाजासाठी व माहिती साठवण्यासाठी केला जातो. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून काही प्रारूपे तयार केली जातात. यामधील यादृच्छिक जंगल गणनविधी (रँडम फॉरेस्ट अल्गोरिदम), चेतासंस्थेचे विविध प्रकारचे जाळे (न्युरल नेटवर्क्स), बहुप्रारूपे (एन्सेम्बल्ड मॉडेल्स), विदांचे वर्गीकरण करणारी यंत्र शिक्षण गणनविधी (सपोर्ट व्हेक्टर मशीन अल्गोरिदम) ही प्रारूपे उपयुक्त ठरली आहेत. ही प्रारूपे जमीन ते अवकाश यामधील विविध स्तरांवरील विविध प्रकारच्या विदांच्या स्राोतांवर प्रशिक्षित केली जातात.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण परिषदेने दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे वणव्यांचे वाढते प्रमाण व धोके टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून जागतिक पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे.

अनघा शिराळकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta kutuhal artificial intelligence for wildfire prediction and prevention zws