डिसेंबर २०१९मध्ये चीनच्या वुहान प्रांतात कोविड-१९ चा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर या विषाणूने संपूर्ण जगात नुसते थैमान घातले. त्या काळात आपण कोणत्या दिव्यातून गेलो आहोत, हे नुसते आठवले तरी अंगावर काटा येतो! नोंदणीकृत आकडेवारीनुसार जगभरात ७० लाखांहून अधिक व्यक्तींनी या साथीत आपले प्राण गमावले. प्रत्यक्ष आकडा त्यापेक्षा जास्त असू शकतो. त्या वेळी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कमी होता. तरीसुद्धा जगात अनेक ठिकाणी या साथीवर मात करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा, विशेषत: यंत्र अध्ययनाचा (मशीन लर्निंग) उपयोग केला गेला.
हिन्सन यांनी २०२२ मध्ये अमेरिकेत यंत्र अध्ययन अल्गोरिदमचा ‘जॉन हॉपकिन्स हेल्थ सिस्टीम’मध्ये वापर केला. जे रुग्ण प्रकृती अतिशय खालावलेल्या अवस्थेत रुग्णालयात दाखल झाले, त्यांच्यावर त्यांनी इलेक्ट्रॉनिक हेल्थ रिपोर्ट डेटाच्या मदतीने नजर ठेवली. त्यांच्या प्रकृतीचा क्षणोक्षणी आढावा घेतला आणि त्यातून मिळालेल्या आकृतिबंधातून नवीन येणाऱ्या रुग्णांना खाटांचे (बेडचे) वाटप कसे करायचे याच्या सूचना दिल्या. जास्तीत जास्त रुग्णांना खाटा मिळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा असा उपयोग झाला. अनेकांचे प्राण वाचले. आपल्याकडे खाटा मिळण्यात किती अडथळे येत होते, हे आठवत असेलच.
आपल्याकडे कोविडच्या साथीत भारत सरकारने आरोग्य सेतू अॅप विकसित केले. सुमारे २१ कोटी लोकांनी हे अॅप डाऊनलोड केले. या अॅपमुळे एखादी व्यक्ती कुणाच्या, कधी संपर्कात आली याचे अपडेट्स मिळत. लस घेतली की नाही तेही कळत असे. कोट्यवधी लोकांची आरोग्यविषयक माहिती त्यामुळे गोळा झाली. आरोग्य सेतूमधून मिळालेल्या विदेच्या विश्लेषणात मशीन लर्निंगचा वापर झाला. त्याच काळात कॅनडामध्ये यंत्र अध्ययनावर आधारित ब्लू डॉट संगणकप्रणाली विकसित करण्यात आली. अनेकविध विभागांकडून प्रचंड विदा यात गोळा करण्यात आली. विमानाची तिकिटे कुणी काढली, कुणी कुठे प्रवास केला अशी माहितीही गोळा करण्यात आली. या प्रणालीकडून ज्या सूचना मिळाल्या त्यानुसार पुढचे नियोजन करण्यात आले आणि साथीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
अमेरिकेत हेल्थमॅप ही प्रणाली विकसित करण्यात आली. त्यामुळे भौगोलिकरीत्या कोविड विषाणूचा प्रसार कसा होत जातोय याचा माग काढता आला. त्यातून रोगाचा प्रसार होण्याआधीच त्यावर नियंत्रण मिळवण्यात मोलाची मदत झाली. जागतिक आरोग्य संघटनेनेही जगातील प्रत्येक राष्ट्रात आवश्यक तेवढ्या कोविड लशींचा पुरवठा व्हावा यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ताधिष्ठित प्रणाल्या वापरल्या.
बिपीन भालचंद्र देशमाने, मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org