मानवी बुद्धिमत्तेने होणाऱ्या शक्य तितक्या कृती अंकीय तंत्रज्ञानामार्फत प्रत्यक्षात घडवायच्या हा कृत्रिम बुद्धिमत्ता विकासाचा गाभा आहे. त्यामुळे, शिक्षणक्षेत्राच्या विविध कार्य व्यवस्थांत कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग केला जाणे हे स्वाभाविक आहे. शिक्षणात प्रभावी अध्यापन, संतुलित समावेशक प्रश्नपत्रिका तयार करणे, उत्तरपत्रिका काटेकोर तसेच वस्तुनिष्ठपणे तपासणे आणि विद्यार्थ्यांचे एकूण मूल्यमापन करणे या कळीच्या बाबी मानल्या जातात. या प्रत्येक घटकासाठी मदत करणाऱ्या संगणकीय प्रणाल्या उपलब्ध होत आहेत. त्यांच्या बाबत इथे आणि पुढील भागांत जाणून घेऊ.
अध्यापनाला पूरक ठरतील अशा अनेक प्रणाल्या बाजारात आल्या आहेत. त्यापैकी कुठली प्रणाली दिलेल्या विद्यर्थी वर्गाला इष्टतम ठरेल याचा निर्णय घेण्यासही कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त वेगळी प्रणाली मदत करू शकते. त्यासाठी विद्यार्थ्यांची निवडक शैक्षणिक माहिती जशी की, मागील काही परीक्षांमध्ये त्यांना मिळालेले गुण आणि अध्यापनासाठी उपलब्ध विविध प्रणालींची तांत्रिक व इतर माहिती त्या मूल्यांकन प्रणालीला दिली की, ती शिक्षकांना योग्य अध्यापन प्रणाली निवडण्यास मदत करते.
विद्यार्थ्यांना वर्गात तसेच घरी अध्ययन अधिक रंजक होण्यात कृत्रिम बुद्धिमत्ता मोलाची मदत करू शकते. प्रत्येक धडय़ाला पूरक अशी दृकश्राव्य माहिती अशा प्रणाली देऊ शकतात. अध्यापन अधिक संवादपूर्ण होऊन विद्यार्थ्यांना पाठय़क्रमातील धडे शिकण्यास चांगली मदत होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थी सहसा वर्गात तल्लीनतेने बसण्यास आणि प्रश्न विचारण्यास उदय़ुक्त होऊ शकतात. काही वेळा विद्यार्थ्यांनाच यंत्र प्रणालीला एखादा धडा किंवा संकल्पना शिकवण्यास सांगून वेगळा अनुभव देता येईल. कारण तिची प्रतिक्रिया पूर्णपणे अनपेक्षित असू शकते आणि नवा दृष्टिकोन देऊ शकते. भविष्यात अशा प्रगत प्रणाली आपल्या आयुष्याचा अविभाज्य अंग होणे अपेक्षित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्याशी कसे जुळवून घ्यायचे याची तयारी होण्यास चालना मिळू शकते. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे साकलिक मूल्यमापन अशा प्रणाल्या करून प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिगत सुधारणा सुचवून त्याचा मागोवा ठेवू शकतात, जे शिक्षकांसाठी अतिशय जिकिरीचे काम असते.
त्याशिवाय प्रशासकीय वेळखाऊ बाबी जशा की, विद्यार्थी, शिक्षक आणि अन्य कर्मचारीवृंदाचा हजेरीपट राखणे, वेळापत्रक बनवणे, अहवाल तयार करणे हे अधिक अचूकतेने, वेळेत आणि कार्यक्षम पद्धतीने करून वित्तीय बचत होण्यास हातभार लागू शकतो. यंत्र आणि मानव यांच्यात सहकार्य आणून एकूण शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास कृत्रिम बुद्धिमत्तेचे भरीव योगदान संभवते.
– डॉ. विवेक पाटकर, मराठी विज्ञान परिषद