ग्रंथालये १९८० च्या दशकापर्यंत पुस्तके, मासिके आणि नकाशे अशा मुद्रित सामग्रीचा संग्रह, देव-घेव आणि जतन अशी पारंपरिकपणे कार्यरत होती. मात्र त्यानंतर अंकीय स्वरूपात (डिजिटल) माहिती निर्मितीचा वाढता कल आणि वापरण्यास सुलभ आणि परवडतील असे संगणकीय तंत्रज्ञान यांच्या प्रवेशामुळे ग्रंथालयाचे स्वरूप बदलू लागले. त्यामुळे ‘अंकीय’ (डिजिटल) किंवा अंकीय व पारंपरिक मिश्रित ग्रंथालय अशी संकल्पना आपल्या देशातही विविध रूपांत राबवली जाऊ लागली. इंटरनेट सुविधा १९९५ मध्ये सुरू झाल्याने ग्रंथालयाच्या संदर्भसेवा तसेच इतर माहिती पुरवण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाले. कारण वाचकांची मागणीदेखील बदलू लागली. सध्या चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे उपलब्ध कृत्रिम बुद्धिमत्तेची साधने ग्रंथालय आणि माहिती क्षेत्रात फार मोठे बदल घडवत आहेत. तरी, त्यापैकी काही निवडक बदल बघू.
भौतिक ग्रंथालयात काही कळीच्या प्रक्रिया असतात, त्यातील एक म्हणजे प्रत्येक पुस्तकाचा मुख्य विषय आणि उपविषय लक्षात घेऊन त्याचे वर्गीकरण करणे. त्यासाठी विविध वर्गवारी पद्धती वापरल्या जातात जशा की, ‘डय़ूई डेसिमल’ आणि रंगनाथन यांची ‘अपूर्णविराम’ (कोलन) प्रणाली. हे वैचारिक काम असून पुस्तकाचा सर्वागीण अभ्यास गरजेचा असतो. मात्र पुस्तकाचे शीर्षक आणि काही संलग्न माहिती अंकीय स्वरूपात दिल्यास कृत्रिम बुद्धिमत्ता पुस्तकाचे योग्य वर्गीकरण, पाहिजे त्या वर्गीकरण प्रणाली अनुसार करून देऊ शकते.
वर्गीकृत पुस्तके विशिष्ट क्रमाने कपाटात ठेवणे हे दुसरे महत्त्वाचे काम असते, जेणेकरून एकाच विषयाची पुस्तके एकत्र आल्याने वाचकास शोध घेणे सुलभ होते. हे काम बहुतांश शारीरिक श्रमाचे असून दैनिकरीत्या करावे लागते, कारण पुस्तकांची देव-घेव रोज होत असते. यासाठी चित्रात दाखवल्याप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्तेने नियंत्रित केलेला यांत्रिक हात मदत देऊ शकतो. वाचकांनी मागितलेली पुस्तके ग्रंथालयाच्या विखरलेल्या संग्रहातून शोधून काढणे आणि नंतर त्यांच्या विशिष्ट जागांवर परत ठेवणे हे त्यामुळे अचूकपणे घडते.
ग्रंथालयातील संग्रहाची पडताळणी (स्टॉक टेकिंग) हे काम वर्षांतून एकदा केले जाणे अपेक्षित असते, ज्यामुळे नोंदवहीत नमूद केल्याप्रमाणे पुस्तकसंग्रह आहे, तसेच पुस्तके योग्य स्थानांवर आहेत याची खात्री होते. त्याशिवाय पुस्तकांची साफसफाई आणि पुनर्बाधणीयोग्य त्यातील वेगळी करणे, असे या तपासणीमुळे घडते. हे काम किचकट व वेळखाऊ असून काही काळ ग्रंथालय त्यासाठी बंदही ठेवले जाते. कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित उपकरणे अतिशय जलद गतीने ते काम करून अहवालही देऊ शकतात.
– डॉ. विवेक पाटकर ,मराठी विज्ञान परिषद