अंतराळ क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्राो), बंगळूरुचे देशाच्या विकासात मोठे योगदान आहे. तिथे आता कृत्रिम बुद्धिमत्तेवर महत्त्वाचे संशोधन होत आहे. चंद्रयान-२ आणि ३ मोहिमेत ‘प्रज्ञान रोव्हर’ लँडर वापरला होता, तो कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून चंद्रावरून संवाद साधत होता. हा रोव्हर सहा चाकांचे रोबोटिक वाहन असून तो कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून स्थापित भाराच्या चाचण्या करतो. याच संस्थेतील संशोधकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्र वापरून एक अल्गोरिदम तयार केला आहे, जो चंद्राच्या पृष्ठभागावरील पाणी आणि इतर खनिजांचा शोध घेतो आणि अभ्यास व विश्लेषणासाठी प्रतिमा तयार करून तो प्रयोगशाळेकडे पाठवतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लेझर पल्सचा वापर लक्ष्य ओळखण्यासाठी मशीन लर्निंग तंत्र व प्रज्ञान रोव्हरमधील मल्टी ऑब्जेक्ट ट्रॅकिंग रडार वापरून लक्ष्याचा आकार, प्रकार आणि स्वरूप ओळखण्यासाठी केला जाऊ शकते. इस्राोने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग केंद्रासाठी एक मॉनिटरिंग प्रणाली तयार केली आहे. या प्रणालीद्वारे वनांचे निरीक्षण, बदल ओळखणे, चोरी रोखणे, वन्यजीव संरक्षण, भौगोलिक माहिती आणि वृक्षतोड थांबवण्यात मदत होते. बद्रीनाथ पुरात अडकलेल्यांचे प्राण वाचवण्यासाठी ही प्रणाली वापरली गेली होती.

याबरोबरच, इस्राोने कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित संवेदकांचा वापर करून किफायतशीर, पुनर्वापरयोग्य, पुनर्प्राप्त करण्यायोग्य, पुनरारंभ करण्यायोग्य आणि विश्वासार्ह अंतराळ प्रक्षेपण करण्यासाठी प्रचालन (प्रोपल्शन) तंत्रज्ञान विकसित केले आहे.

नवी दिल्लीस्थित संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि तिच्या हैद्राबाद, तिरुवनंतपुरम प्रयोगशाळा देशाच्या संरक्षणक्षमतेत मोलाची भूमिका बजावत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधरित ड्रोन व रोबोटिक शस्त्र प्रणाली शत्रूंच्या बलस्थानावर दूरनियंत्रित अथवा स्वायत्तपणे हल्ला करू शकतील, अशी अस्त्रे निर्माण केली आहेत. देशाच्या आणि संरक्षण खात्याच्या दूरसंचार क्षेत्रात अनिधिकृत प्रवेशास प्रतिबंध करण्यासाठी याच तंत्रावर आधारित प्रणाली विकसित केली आहे. याच तंत्रज्ञानाचा वापर करून गस्तीसाठी, तपासणी किंवा लढाईसाठी वापरली जाणारी स्वयंचलित वाहने आणि पाणबुड्या विकसित केल्या आहेत. यंत्रशिक्षण प्रणालीच्या साहाय्याने शत्रू प्रदेशातील टेहळणीसाठी लागणारी चालकरहित विमाने तयार करण्यात आली आहेत. ती शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवतात. आभासी (व्हर्च्युअल) लढाईसदृश परिस्थिती निर्माण करून सैन्याला प्रशिक्षण दिले जाते. संरक्षण क्षेत्रातील सुरक्षेबरोबरच नवीन शस्त्र प्रणालींच्या विकासासाठी आणि संरक्षणाच्या विविध आव्हानांना उत्तर देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर केला जात आहे.

 अल्पना कुलकर्णी

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta kutuhal artificial intelligence isro and drdo amy