कृत्रिम बुद्धिमत्तेला सुरुवातीच्या काळात दोन उत्कृष्ट मार्गदर्शक लाभले आणि ती फोफावली.
१४ डिसेंबर १९५६ रोजी जन्मलेले अमेरिकन संगणक वैज्ञानिक पीटर नॉर्विग हे त्यापैकी एक आहेत. अमेरिकेतील स्टॅनफर्ड मानव केंद्रित कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था येथे ते महनीय प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी ‘गूगल’साठी संशोधन आणि शोध गुणवत्ता संचालक म्हणून काम केले आहे. त्यांच्या ऑनलाइन अभ्यासगटात १ लाख ६० हजार विद्यार्थी आहेत. अमेरिकेच्या ‘नासा’ या अंतराळ संशोधन प्रकल्पात त्यांनी वरिष्ठ संगणक वैज्ञानिक आणि संगणकीय विज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून काम केले. २००१ मध्ये त्यांना ‘नासा’चा महनीय असा प्रतिभावंत उपलब्धी पुरस्कार प्रदान केला गेला.
नॉर्विग हे उत्कृष्ट मार्गदर्शक होते. त्यांनी आपल्या विद्यार्थी वर्गासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर पुस्तकेही लिहिली. स्टुअर्ट रसेल यांच्यासोबत त्यांनी लिहिलेले ‘‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ एक आधुनिक दृष्टिकोन’ हे १९९५ पासून या क्षेत्रातील एक जागतिक कीर्तीचे पाठय़पुस्तक म्हणून गाजते आहे. याशिवाय महत्त्वाची बाब अशी की उलटसुलट कसाही वाचला तरी सारखाच राहतो असा पॅलिंड्रोम पद्धतीचा जागतिक प्रदीर्घ लांबीचा शब्ददेखील पीटर नॉर्विग यांच्याच नावावर आहे.
दुसरे शिक्षक स्टुअर्ट जोनाथन रसेल हे ‘ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर’ हा सन्माननीय किताब मिळवणारे ब्रिटिश संगणक वैज्ञानिक आहेत. ब्रिटनमधील पोर्ट्समथ परगण्यात १९६२ मध्ये जन्मलेले स्टुअर्ट रसेल यांनी वाडहॅम महाविद्यालय आणि स्टॅनफर्ड तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षण पूर्ण केले. अमेरिकेतील बर्कले येथील कॅलिफ़ोर्निया विद्यापीठात ते संगणक विज्ञानाचे प्राध्यापक होते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रांतात त्यांची कामगिरी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. येथेच त्यांनी ‘‘मानवाशी सुसंगत अशा कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्रा’’ची स्थापना केली आणि पीटर नॉर्विग यांच्यासोबत ‘‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ एक आधुनिक दृष्टिकोन’ या शीर्षकाचे पाठयपुस्तक लिहिले. हे पुस्तक १३५ देशांमधील १५०० हून अधिक विद्यापीठांमध्ये शिकवले जाते.
अगदी अलीकडेच त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेमधून जग कसे उद्ध्वस्त करू नये याविषयी एक उत्कृष्ट प्रस्तुती सादर केली. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे कोणतीही वागणूक गुणवत्ता पूर्ण पद्धतीने आत्मसात करणारी बुद्धिमान यंत्रे तयार करण्याची संकल्पना आहे आणि ती मानवाला सक्षम करेल, परंतु त्याची जागा घेऊ शकणार नाही असे ते म्हणतात. – उज्ज्वल निरगुडकर, मराठी विज्ञान परिषद