माणसाचे हस्ताक्षर ओळखणे आणि अशा मजकुराला संगणकीय म्हणजेच ‘डिजिटल’ रूपात बदलणे हा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. अजूनही मोठ्या प्रमाणावर लिखित मजकूर तयार होत असल्यामुळे हा मजकूर संगणकच थेट वाचून त्याचा अर्थ समजून घेऊ शकला तर यामुळे खर्च, वेळ, मेहनत या सर्वच बाबतींमध्ये खूप बचत होईल; असा यामागचा उद्देश असतो. रुग्णालयांमध्ये रुग्ण तसेच त्यांचे नातेवाईक यांच्याकडून भरली जाणारी माहिती, बँका तसेच इतर वित्तसंस्थांत येणारे धनादेश, निरनिराळ्या प्रकारचे अर्ज यांच्यासंबंधीच्या असंख्य लिखित नोंदी, सरकारी कार्यालयांमध्ये होत असलेल्या नोंदी यांसारख्या असंख्य ठिकाणी हे तंत्रज्ञान खूप उपयुक्त ठरते. इतके दिवस या कामासाठी ऑप्टिकल कॅरॅक्टर रेकग्निशन (ओसीआर) या तंत्रज्ञानाचा वापर केला जात असे. आता मात्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने हे काम अधिक आधुनिक पातळीवर जाऊन पोहोचले आहे. तसेच ओसीआर तंत्रज्ञानामध्ये पुरेशी अचूकता नसण्याच्या प्रश्नावरही यामुळे काही प्रमाणात मात करणे शक्य झाले आहे. यासाठी व्हिजन एआय, लार्ज लँग्वेज मॉडेल्स (एलएलएम) अशा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधुनिक शाखांची मदत घेतली जाते.

हेही वाचा >>> कुतूहल : चेहऱ्यावरून ओळख पटवताना सावधान!

हस्ताक्षराची ओळख पटवण्यासाठी दोन प्रमुख पद्धतींचा वापर केला जातो. पहिली पद्धत ‘ऑनलाइन’ प्रकारची असते. यात एखादा माणूस लिहीत असतानाच तो लिहीत असलेला मजकूर ओळखण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी संबंधित माणसाने विशिष्ट प्रकारचे पेन किंवा ‘स्टायलस’ हे पेनासारखे उपकरण वापरणे आवश्यक असते. याला जोडलेल्या सेन्सरद्वारे त्याचे हस्ताक्षर ओळखण्याचे काम सुरू होते. या उपकरणाच्या हालचाली अत्यंत सूक्ष्मपणे निरखून त्या हालचालींचा अर्थ अक्षरे तसेच शब्द या मार्गांनी लावण्याचा प्रयत्न हे तंत्रज्ञान करते. पेनावर संबंधित माणसाने दिलेला दाब, आधी उल्लेख केल्याप्रमाणे त्याने पेनाच्या केलेल्या हालचाली हे सगळे टिपून त्यानुसार त्याच्या लिखाणाचा अर्थ लावला जातो. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाला अशा प्रकारे हस्ताक्षर ओळखणे हे तुलनेने सोपे जाते.

या मानाने दुसरी ‘ऑफलाइन’ पद्धत जरा जास्त किचकट असते. या पद्धतीमध्ये लिखित मजकूर आधीपासूनच उपलब्ध असतो. म्हणजेच मजकूर लिहिलेल्या कागदाचे छायाचित्र टिपून त्यानंतर त्यामधल्या मजकुराचा अर्थ लावण्याचे आव्हान तंत्रज्ञानासमोर असते. जर छायाचित्रामधली अचूकता पुरेशी नसेल किंवा त्याचा दर्जा खराब असेल तर हस्ताक्षर ओळखण्याच्या तंत्रज्ञानासाठी हे काम अतिशय बिकट ठरू शकते. लिखित मजकुराचा अर्थ लावण्याबरोबरच अमुक मजकूर अमुक माणसानेच लिहिला आहे अथवा नाही याविषयी भाष्य करण्याचे कामही हस्ताक्षरतज्ज्ञांप्रमाणे करण्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठा वाटा असतो.अतुल कहाते

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org