मोठ्या शहरांत वाहतूक कोंडी प्रचंड प्रमाणावर होते. कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित पॅसेंजर मॅनेजमेंट सिस्टम आणि इतर स्मार्ट उपकरणांच्या साहाय्याने स्थानिक वाहन व्यवस्था, उपलब्ध वाहन व्यवस्थापन, मनुष्यबळ व्यवस्थापन व स्थानिकांच्या समस्यांचे निराकरण केले जाते. रस्त्यात वाहने बंद पडण्याची कारणे काय आहेत, नेमका कोणत्या वेळी आणि कुठे विलंब होतो, वाहतूक कोंडीची कारणे या विषयीची इत्थंभूत माहिती कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित उपकरणाला पुरवली की उपयोजित तंत्रे पूर्वीच्या माहितीचे नवीन माहितीच्या आधारे विश्लेषण करून वाहतूक अधिकाऱ्यांना वाहतूक व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक तत्त्वे सुचवतात.
शहराच्या विशिष्ट भागात विशिष्ट वेळेत किंवा कालावधीत खासगी वाहनांची गर्दी किती होते याचे विश्लेषण कृत्रिम बुद्धिमत्ता करते. त्या विश्लेषणाचा वापर करून होणारी कोंडी कमी करता येईल का? इंधन बचत किती होईल तसेच विशिष्ट प्रसंगी त्या- त्या भागात होणारी गर्दी टाळण्यासाठी काय उपाययोजना केल्या तर प्रश्न सुटेल, इत्यादी माहिती कृत्रिम बुद्धिमत्ताआधारित उपकरणे व्यवस्थापनाला देतील व त्या आधारे वाहतूक नियंत्रित केली जाईल. स्मार्ट शहरांत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे शहरातील वाहनांचे नियोजन करता येते.
मोठ्या शहरांत पार्किंगसाठी राखीव जागा असतात. उद्याोग, व्यवसाय ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चालतात तिथे त्या भरपूर पैसे देऊन पूर्णत: वापरल्या जातात. मात्र इतर ठिकाणी पार्किंगच्या जागांचा आकार कमी असतो आणि तरीही त्या अंशत:च वापरल्या जातात. अशा वेळी लायसन्स प्लेट ओळखणारी कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्रणा मदतीला येते. गर्दीच्या वेळी विशिष्ट भागात रोज किती वाहने येतात, ते किती वेळ थांबतात, त्यांची संख्या किती, तात्पुरती वाहने किती येतात, कोणत्या दिवशी, कोणत्या वेळी येतात ही सगळी माहिती जमा करून विश्लेषण केले जाते. या माहितीच्या आधारे पार्किंगच्या जागांची मागणी आणि पुरवठा यांचे गणित जुळवता येते. अद्यायावत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राचा वापर करून पार्किंगच्या जागेचे त्या त्या वेळेचे शुल्क निर्धारित करता येते. पार्किंच्या जागेला पूर्वी जी मागणी होती त्याची आकडेवारी आणि आजची मागणी याचे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने विश्लेषण करून योग्य ते शुल्क निश्चित करता येते. अशाप्रकारे पार्किंगची समस्या तर सोडविता येतेच त्याचबरोबर पालिकेला आर्थिक उत्पन्नही मिळते.