‘कृत्रिम सर्वसमावेशक बुद्धिमत्ता’ (आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स) म्हणजे मानवासारखी बहुआयामी आणि सर्वंकष बुद्धिमत्ता असलेली कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली. सध्याच्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली विशिष्ट कार्यांसाठी विकसित केलेल्या असतात आणि त्या प्रतिमा ओळखणे किंवा भाषांतर करणे, यांसारखी सुस्पष्टपणे परिभाषित कामे उत्तमपणे करतात. तथापि, त्यांच्यामध्ये मानवी सर्वसमावेशक बुद्धिमत्ता, अनुकूलनक्षमता (अॅडॅप्टेबिलिटी) आणि लवचीकता यांचा अभाव असतो.
तरी, कृत्रिम सर्वसमावेशक बुद्धिमत्तेमधील संशोधन अशा प्रणाल्या विकसित करण्यासाठी पुढील गोष्टींवर भर देत आहे : विविध प्रकारची विदा जसे की, मजकूर, प्रतिमा आणि व्हिडीओ यांच्या विश्लेषणाने प्रशिक्षित होऊन ते प्राप्त केलेले ज्ञान आवश्यकतेनुसार वापरणे, कृत्रिम सर्वसमावेशक बुद्धिमत्ता विकसनाकरिता मानवी मेंदूच्या कार्याचा सखोल अभ्यास करणे, नैसर्गिक आणि संदर्भानुसार मानवी भाषा समजणे, अपरिचित वातावरण आणि आव्हाने यांचे आकलन करून त्याच्याशी जुळवून घेणे, अमूर्त संकल्पना समजावून घेणे, भावनिक संकेतांचे अचूक अर्थ लावून सुयोग्य प्रतिसाद देणे आणि विविध संज्ञानात्मक कार्ये (तर्क, सर्जनशीलता, समस्यांचे निराकरण) मानवी मेंदूप्रमाणे लवचीक आणि एकत्रितपणे करणे, तसेच मानवी मूल्ये व सामाजिक निकषांशी सुसंगत वर्तन घडवणे.
कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामध्ये जरी विलक्षण वेगाने प्रगती होत असली तरी अजूनही आपण कृत्रिम सर्वसमावेशक बुद्धिमत्ता साध्य करण्यापासून बरेच दूर आहोत. त्याला मुख्य कारण म्हणजे मानवी मेंदूची कार्यप्रणाली आणि त्यामधील बुद्धिमत्ता निर्मिती यांचे वैज्ञानिकांना अद्याप पूर्ण आकलन झालेले नाही. तसेच वर्तमान कृत्रिम बुद्धिमत्ता अल्गोरिदम्स आणि तंत्रज्ञान व ऊर्जा स्राोत कृत्रिम सर्वसमावेशक बुद्धिमत्तेला कार्यान्वित करण्यास पुरेसे शक्तिशाली नाहीत, मानवी मेंदूप्रमाणे ‘सामान्यीकरण’ क्षमता (एका क्षेत्रातील ज्ञानाचा दुसऱ्या क्षेत्रामध्ये वापर) असणाऱ्या प्रणालींची निर्मिती कठीण आहे.
कृत्रिम सर्वसमावेशक बुद्धिमत्ता केव्हा अस्तित्वात येऊ शकेल याबद्दल वेगवेगळी भाकिते जरी नित्यनेमाने होत असली, तरी २०५० पूर्वी ती अस्तित्वात येणे अवघड आहे असे अनेक तज्ज्ञांचे अनुमान आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या सीमा वेगाने विस्तारत आहेत, परिणामी कृत्रिम सर्वसमावेशक बुद्धिमत्तेचा उदय भविष्यात होणे ही आता शक्य कोटीतील गोष्ट वाटते. तिच्या असामान्य क्षमतांमुळे सामाजिक, आर्थिक, विज्ञान, तंत्रज्ञान, राजकीय आणि सामरिक क्षेत्रांवर ‘न भूतो’ परिणाम होणार आहेत आणि त्यांना कसे सामोरे जायचे याबद्दल वैज्ञानिक, समाजधुरीण आणि राजकारणी यांना आतापासूनच गंभीरपणे विचार करावा लागणार आहे.
– डॉ. संजीव तांबे, मराठी विज्ञान परिषद