अणुभट्टीसाठी लागणारे इंधन हे युरेनियम आणि थोरियम या मूलद्रव्यांच्या खनिजापासून तयार केले जाते. अणुऊर्जेच्या निर्मितीसाठी त्यांची आवश्यकता भासते. या दोहोंपैकी युरेनियमच्या ऑक्साइडच्या रूपातल्या खनिजाचे नाव युरेनिनाइट आहे. किंवा त्याला पिचब्लेंड असेही म्हणतात. गेल्या ६० वर्षांपासून मुख्यत: हेच खनिज वापरून युरेनियमचे उत्पादन केले जाते. वास्तविक युरेनियमचे साठे अग्निजन्य (इग्निअस), अवसादी (सेडिमेंटरी) आणि रूपांतरित (मेटॅमॉर्फिक) अशा तिन्ही प्रकारच्या खडकांमध्ये आणि तेही विविध स्वरूपाच्या खनिजांमध्ये मिळतात. शिवाय ते निरनिराळ्या भूवैज्ञानिक कालखंडात निर्माण झालेल्या खडकांमध्ये मिळतात.
परंतु यातले सर्वच साठे खाणकाम करावे अशा गुणवत्तेचे नसतात. कुठल्याही खनिजाचे खाणकाम करावे की नाही, हे खनिजाचा दर्जा कसा आहे, तो साठा किती समृद्ध आहे आणि व्यवसायक्षेत्रात त्या खनिजाला किती मागणी आहे, या बाबींवर अवलंबून असते.
जगातल्या सर्व युरेनियमच्या साठ्यांचा आढावा आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संघटना (इंटरनॅशनल अटॉमिक एनर्जी एजन्सी) नियमितपणे घेत असते. अद्यायावत् आढाव्यानुसार, युरेनियमचे खाणकाम करण्यायोग्य साठे हे ५५ देशांत मिळून ७९ लाख टनांचे आहेत. यांपैकी निम्म्याहून अधिक साठे ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि कझाखस्तान या तीन देशांमध्ये आढळतात. साहजिकच युरेनियमचे सर्वांत जास्त उत्पादन या तीन देशांतच होते. जगात ऊर्जानिर्मितीसाठी ३१ देशांत मिळून ४४० अणुभट्ट्या कार्यरत आहेत. त्या साऱ्या मिळून फार मोठ्या प्रमाणात विद्याुतनिर्मिती करतात. त्यासाठी प्रतिवर्षी ६७,५०० टन युरेनियमची आवश्यकता असते.
भारतात युरेनियमच्या साठ्यांचा शोध घेण्यासाठीचे सर्वेक्षण १९५० पासून सुरू झाले. आतापर्यंत सुमारे २,२०,९०० टन युरेनियमच्या साठ्यांचा शोध लागला आहे, त्यापैकी ५६ टक्के साठे आंध्र प्रदेशात, २५ टक्के साठे झारखंडमध्ये, तर सात टक्के साठे मेघालयात आहेत. तथापि आघाडीच्या उत्पादक देशांच्या तुलनेत भारतातले बहुतेक साठे कमी प्रतवारीचे आणि लहान आहेत.
युरेनियमच्या मानाने थोरियमला मागणी कमी आहे. थोरियमचे साठे मोनाझाइट नावाच्या खनिजाच्या स्वरूपात सापडतात. तसे पाहिले, तर मोनाझाइट स्वतंत्र खनिज नसून तो खनिजांचा गट आहे. काही मूलद्रव्ये अतिशय दुर्मीळ आहेत. त्या मूलद्रव्यांना दुर्मीळ मृत्तिकांचा समूह म्हणतात आणि त्यांच्या फॉस्फेट स्वरूपात आढळणारा खनिजांचा गट म्हणजे मोनाझाइट गट. त्या गटात दुर्मीळ मृत्तिका. थोरियम आणि अल्प प्रमाणात युरेनियम ही मूलद्रव्ये असतात. त्यात थोरियमच्या ऑक्साइडचे प्रमाण साधारणपणे ८-१० टक्के असते. मोनाझाइटचे साठे किनारपट्टीच्या पुळणीमध्ये, भारी खनिजयुक्त वाळूच्या स्वरूपात आढळतात. भारत थोरियमच्या बाबतीत खूप समृद्ध आहे.
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org