सागरी दळणवळणामुळे प्रदूषणाला आणि पर्यावरणाच्या विघातक परिणामांना आमंत्रण देणारे ‘गिट्टी (बलास्ट) पाणी’ म्हणजे मोठय़ा जहाजांना स्थिर ठेवण्यासाठी जहाजामधील गिट्टी टाक्यांमध्ये जमा केलेले गोडे अथवा खारे पाणी. गिट्टी पाणी साठवण्यासाठी जहाज, बोट अथवा पाणबुडी यांमध्ये एक टाकी असते. खवळलेल्या समुद्रातही प्रवासी वाहतुकीच्या व मालवाहू बोटी दळणवळणादरम्यान स्थिर ठेवण्यासाठी, तसेच जहाज कुशलतेने चालविण्यासाठी गिट्टी टाक्यांमध्ये पाणी साठवले जाते. जहाजांच्या स्थिरतेसाठी गिट्टी पाण्याचे वजन आणि पातळी सर्वसाधारणपणे समुद्र पातळीच्या खाली ठेवणे गरजेचे असते. हे पाणी जहाजाच्या प्रवासादरम्यान नियमितपणे भरले जाते आणि नंतर समुद्रात सोडले जाते. गिट्टी (बलास्ट) पाण्याची मूळ संकल्पना ब्लोफिश, ऑक्टोपस यांसारख्या समुद्री जीवांपासून घेण्यात आली. गिट्टी टाक्यांमध्ये पाण्याबरोबरच पूर्वी टाकाऊ पदार्थ टाकले जात असत. काही वर्षांपूर्वी बोटीच्या गिट्टी टाकीत दगड-धोंडेदेखील भरले जात आणि प्रवासानंतर दगडांचा उपयोग पोहोचलेल्या ठिकाणी शिल्प अथवा घरे बनविण्यासाठी केला जात असे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही दशकांत बोटी आणि जहाजांची वर्दळ वाढली. त्यामुळे बलास्ट पाण्यामार्फत आक्रमक आणि आगंतुक प्रजातींचे सागरी परिसंस्थेतील इतर ठिकाणी होऊ शकणारे स्थलांतर किंवा अतिक्रमण हा चिंतेचा विषय ठरत आहे. रशिया आणि युक्रेन येथील गोडय़ा पाण्यातील झेब्रा मसलचे (शिंपला) इतर देशांत होणारे अतिक्रमण हे एक उत्तम उदाहरण आहे. साधारणत: दरवर्षी १० अब्ज टन इतके बलास्ट पाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेले जाते. बलास्ट पाण्यात काही वनस्पती, जीव, जिवाणू यांसारख्या जैविक पदार्थाचा तसेच विषाणूंचा समावेश असतो. हे सर्व पदार्थ मुळात तेथील नसल्याने स्थानिक प्रजातींसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता असते. यामुळे जलीय परिसंस्थेच्या प्रदूषणाबरोबरच पर्यावरणीय, आर्थिक आणि मानवी आरोग्याचे नुकसान होऊ शकते. २०२० मध्ये ‘बलास्ट वॉटर मॅनेजमेंट परिषदे’त ८१ देशांनी सहभाग घेतला होता. या देशांनी जहाजातील बलास्ट पाण्याचे व्यवस्थापन नियमानुसार करणे बंधनकारक आहे. राष्ट्रीय सागरी संघटनेनेसुद्धा काही जिवाणू, वॉटर फ्लीज, विषारी शैवाल, शिंपले, कोंब जेली यांसारख्या काही उपद्रवी जीवांची एक यादी तयार केली आहे. यातील काही बलास्ट पाण्यामध्ये असण्याची शक्यता असते. हे घातक ठरू शकते.

डॉ. नीलिमा कुलकर्णी ,मराठी विज्ञान परिषद

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta kutuhal ballast water in ships amy
Show comments