कृत्रिम बुद्धिमत्तेने कलेच्या क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे बीथोवन या अभिजात संगीतकाराच्या दहाव्या सिंफनीला लाभलेले मूर्त स्वरूप. बीथोवनचे १८२७ मध्ये निधन झाले. मृत्यूच्या तीन वर्षे आधी त्याने आपल्या दहाव्या सिंफनीच्या निर्मितीला सुरुवात केली. परंतु प्रकृतिअस्वास्थ्यामुळे तो आपली ही सिंफनी पूर्ण करू शकला नाही आणि ती अपूर्णच राहिली. सिंफनी हा मोठ्या वाद्यावृंदाकडून सादर केला जाणारा सांगीतिक प्रकार असून तो चार भागांत विभागलेला असतो. बीथोवन या सिंफनीचा पहिला भागही पूर्ण करू शकला नव्हता. त्याच्या या अपूर्ण सिंफनीचे स्वरूप होते – स्वररचनेची फक्त काही रेखाटने आणि त्याबरोबर केलेल्या काही लेखी नोंदी! अपूर्ण अवस्थेत असलेली ही सिंफनी आता कृत्रिम बुद्धिमतेच्या आधारे पूर्ण केली गेली आहे. ऑस्ट्रियातील ‘कारायन इन्स्टिट्यूट’ने हे आव्हान पेलले आहे.
हेही वाचा >>> कुतूहल : अग्निवापराच्या इतिहासाचा मागोवा…
या कामाच्या सुरुवातीच्या टप्प्यात, प्रथम कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीला अठराव्या शतकात होऊन गेलेल्या बाख, मोझार्ट यांसारख्या नामवंत संगीतकारांच्या रचना पुरविण्यात आल्या. त्या काळातील संगीताची ओळख करून दिली गेली. त्यानंतर खुद्द बीथोवनच्या सर्व रचनांद्वारे त्याला बीथोवनच्या शैलीचीही ओळख करून दिली गेली. अशा प्रकारे त्याच्या संगीत निर्मितीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली सज्ज झाली. त्यानंतर त्याच्या दहाव्या सिंफनीला पूरक ठरतील अशा लहान स्वरावली या प्रशिक्षित प्रणालीकडून निर्माण करून घेतल्या गेल्या. या स्वरावलींतून संगीततज्ज्ञांनी दहाव्या सिंफनीला जास्तीत जास्त अनुरूप ठरेल अशा स्वरावलीची निवड झाली. त्यानंतर अन्य एका कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीद्वारे या स्वरावलीवर आधारलेला वाद्यासंगीताचा एक तुकडा निर्माण केला गेला व मोठ्या वाद्यावृंदाद्वारे त्याची संगीततज्ज्ञांकडून प्रत्यक्ष चाचणी घेतली गेली.
हेही वाचा >>> कुतूहल : खनिजांचे वितळणबिंदू
ही स्वरावली अशा प्रकारे स्वीकारली गेल्यानंतर, त्यापुढील लहान स्वरावलींची अशाच प्रकारे क्रमाक्रमाने निर्मिती केली गेली. अखेर या सिंफनीचे चारही भाग पूर्ण होऊन दहाव्या सिंफनीला संपूर्ण स्वरूप प्राप्त झाले. बीथोवनच्या जन्माला अडीचशे वर्षं पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून, २०२१ साली जर्मनीतील बॉन येथे या सिंफनीचे जाहीर सादरीकरण केले गेले. या सिंफनीचे स्वरूप हे बीथोवनला अभिप्रेत असलेल्या सिंफनीपेक्षा कदाचित काहीसे वेगळे असू शकेल. मात्र ते कसे असू शकेल, याबद्दलच्या अनेक अज्ञात शक्यतांपैकी एक शक्यता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने संगीतप्रेमींसमोर उलगडली गेली आहे.
– डॉ. राजीव चिटणीस
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
सकेंतस्थळ : http://www.mavipa.org