बिल गेट्स! ‘मायक्रोसॉफ्ट’ या संगणक कार्यप्रणालीचे (सॉफ्टवेअर) आद्याप्रणेते आणि संस्थापक. त्यांच्या प्रयत्नामुळेच संगणकयुग खऱ्या अर्थाने सुरू झाले. आणि आता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रातही त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बिल गेट्स यांचा जन्म २८ ऑक्टोबर १९५५ रोजी सिअॅटल येथे झाला. शाळेत असल्यापासूनच बिल गेट्स यांना प्रोग्रामिंग आणि सॉफ्टवेअरमध्ये स्वारस्य होते. वयाच्या १३व्या वर्षीच त्यांनी पहिला ‘टिक-टॅक-टो’ नावाचा प्रोग्राम बनवला.

पुढे आईवडिलांच्या इच्छेखातर कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला; पण जगातील पहिला मायक्रोकॉम्प्युटर इंटेल ८०८० येणार असल्याची बातमी आली आणि नव्याने येत असलेल्या संगणकांना पुढे मोठ्या प्रमाणात सॉफ्टवेअर लागेल, याची जाणीव बिल गेट्स आणि त्यांचा मित्र पॉल अॅलन यांना झाली. अथक प्रयत्नांनी संगणकाला उपयोगी पडू शकेल असे ‘बेसिक’ सॉफ्टवेअर त्यांनी तयार केले. संगणकाला कार्य करण्यासाठी एम एस- डॉस ही कार्यप्रणाली त्यांनी शोधून काढली. त्यानंतर १९८५ साली ‘विंडोज’ ही कार्यप्रणाली कार्यरत केली.

हेही वाचा >>> कुतूहल : दृश्य संवाद कृत्रिम बुद्धिमत्ता

१९ वर्षीय बिल गेट्स आणि २२ वर्षीय अॅलन पॉल यांनी १९७५ मध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीची स्थापना केली. १९८० साली संगणक उद्याोगात नव्याने उतरलेल्या आयबीएमने मायक्रोसॉफ्टला कार्यप्रणालीची ऑर्डर दिली. ही प्रणाली प्रचंड लोकप्रिय झाली. कालानुरूप बिल गेट्स यांनी नवनवीन संगणक प्रणाली शोधल्या. उदा. विंडोज, मायक्रोसॉफ्ट ऑफिस, इंटरनेट एक्स्प्लोरर इत्यादी. या प्रणाली प्रचंड लोकप्रिय झाल्या. मायक्रोसॉफ्ट हे तंत्रज्ञानाच्या बाबतीत जगभरात अव्वल ठरले. या व्यवसायात त्यांना अमाप संपत्ती मिळाली, ते जगातील श्रीमंत व्यक्तींत गणले जाऊ लागले. सामाजिक बांधिलकी जपत बिल गेट्स यांनी आपल्या वैयक्तिक संपत्तीचा बराचसा भाग गरजूंसाठी दिला आणि पत्नीसमवेत त्यांनी ‘बिल मेलिंडा गेट्स फाऊंडेशन’ ही संस्था सुरू केली.

२०१६ साली ओपनआयच्या टीमने कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) प्रात्यक्षिक दाखवले तेव्हा बिल गेट्सना एआयमुळे होणाऱ्या क्रांतीचा अंदाज आला.

भविष्यात एआयच्या वापरामुळे उद्याोग-व्यापाराला चालना मिळेलच, पण समाजकल्याणासाठी विविध क्षेत्रांत प्रगती होईल; या त्यांच्या विचारामुळे गेट्स फाऊंडेशनमार्फत आरोग्य, शिक्षण, कृषी, इत्यादी क्षेत्रांत एआयचा वापर प्रभावीपणे कसा करता येईल यावर संशोधन सुरू आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा व्यापक परिणाम माणसाच्या कार्यप्रणालीवर निश्चित होणार आहे. मात्र या तंत्राचा गैरवापर करण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार आणि कंपन्यांना अनेक कडक नियम आणि कायदे करावे लागतील, असे बिल गेट्स यांचे मत आहे.

चारुशीला जुईकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta kutuhal bill gates important contribution in the field of artificial intelligence zws