एक ग्रहगोल म्हणून पृथ्वीचे वर्णन कसे करता येईल, हे ख्यातनाम ब्रिटिश भूवैज्ञानिक डॉ. आर्थर होम्स यांनी अगदी चपखल शब्दांत सांगितले आहे. ते म्हणतात, ‘‘पृथ्वीचे कवच खडकांनी बनलेले असल्यामुळे पृथ्वी एखाद्या खडकाच्या चेंडूसारखी भासते. बऱ्याच मोठ्या क्षेत्रावर ते कवच महासागरांमुळे पाण्याखाली लपलेले असते. खडकांच्या या चेंडूवर वातावरणाचे आच्छादन आहे.’’
पृथ्वीभोवती, तिच्या पृष्ठभागानजीक विविध वायूंचे आवरण आहे. त्यालाच आपण वातावरण म्हणतो. पृथ्वीचे कवच निरनिराळ्या खडकांचे मिळून तयार झाले आहे. त्याला शिलावरण (लिथोस्फियर) म्हणतात. शिलावरणाचे पंच्याहत्तर टक्के क्षेत्र महासागरांमधल्या; तसेच जमिनीवरील तळी, सरोवरे, नद्या यांच्या पाण्याने व्यापलेले आहे. शिवाय जमिनीवरचे जे पाणी खडकात मुरते, त्याला आपण भूजल म्हणतो. तेही जर हिशोबात धरले, तर पृथ्वीवर पाण्याचेही एक आवरण आहे, असे लक्षात येईल. त्याला जलावरण (हायड्रोस्फियर) म्हणतात.
जमिनीवर, हवेमध्ये, गोड्या पाण्यात आणि सागरांमध्ये कित्येक प्राणी आणि वनस्पती अस्तित्वात आहेत. त्यांच्या संख्येत डोळ्यांना न दिसणारे अब्जावधी सूक्ष्मजीव जोडले, तर ही संख्या खूपच मोठी होईल. कारण सूक्ष्मजीव मातीत, पाण्यात, ध्रुवीय प्रदेशांच्या आणि पर्वतांवरच्या बर्फात, तसेच वाळवंटांच्या वाळूतही अगदी सर्वत्र असतात. सजीवांनी बनलेल्या या आवरणाला जीवावरण (बायोस्फियर) म्हणतात.
जसजसा भूविज्ञानाचा विकास होत गेला, तसतसे वैज्ञानिकांच्या लक्षात आणखी काही आवरणांचे अस्तित्व आले. त्यात पृथ्वीवर जिथे जिथे बर्फ आहे, किंवा टंड्रा या नावाने ओळखली जाणारी उत्तर गोलार्धातली गोठलेली जमीन आहे अशा क्षेत्रांना हिमावरण (क्रायोस्फियर) म्हणतात. तर पृथ्वी स्वत: एक लोहचुंबक असल्याने अवकाशात पसरलेल्या तिच्या चुंबकीय क्षेत्राला चुंबकीय आवरण (मॅग्नेटोस्फियर) म्हणतात.
महत्त्वाची बाब म्हणजे ही सर्व आवरणे एकमेकांवर अवलंबून आहेत. कारण त्यांच्यामध्ये आपापसात सतत काही ना काही आंतरक्रिया चाललेल्या असतात. उदाहरणार्थ, प्रवाळांची वाढ जिथे जोरात असते, तिथे प्रवाळ भित्ती (कोरल रीफ) नावाचा पाषाण बनतो किंवा अवसादी पाषाण बनताना त्यात वनस्पतींचे अवयव गाडले गेले, तर दगडी कोळशाचे साठे तयार होतात. तसेच, ज्वालामुखीच्या उद्रेकाबरोबर शिलावरणातून काही वायू वातावरणात सोडले जातात. नद्या, हिमनद्या आणि वारा यांच्यामुळे खडकांची झीज होते.
१९८० मध्ये अमेरिकन संघराज्याच्या ‘राष्ट्रीय वायुयानविद्या अवकाश प्रशासन’ (नॅशनल एरोनॉटिकल स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन, नासा) संस्थेने या सर्व आवरणांमधल्या अशा आंतरक्रियांच्या प्रणालीला ‘पृथ्वी विज्ञान प्रणाली’ (अर्थ सायन्स सिस्टीम) असे नाव दिले आहे.
अंजली सुमतीलाल देसाई,मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org