महाराष्ट्रामध्ये एकूण १९ खारफुटींच्या प्रजाती असून १२ विविध कुलांत त्यांचे विभाजन झाले आहे. या कुलांत ऱ्हायझोफोरेसी हे सर्वात मोठे कुल असून त्यामध्ये ब्रूगेरा सीलिंड्रिका या प्रजातीचा समावेश होतो. या प्रजातीचे वास्तव्य रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे कमी प्रमाणात तर मुंबई, ठाणे, रायगड येथे जास्त प्रमाणात आढळते. पानांचा आकार, मुळांची रचना, शेंगेसारखे दिसणारे बीजांकुरित फळे, अपत्यजनन या सर्व वैशिष्टय़पूर्ण गुणांमुळे सामान्य वनस्पतीपेक्षा ऱ्हायझोफोरेसी कुलातील या खारफुटीचे वेगळेपण दिसून येते. हे एक सदाहरित झाड असून त्याची उंची साधारणपणे २० मीटपर्यंत वाढू शकते.
ब्रूगेरा सीलिंड्रिका दलदलीत वाढत असल्यामुळे त्यांना श्वसनासाठी स्वत:मध्ये बदल करावे लागतात. या प्रजातीमध्ये मुळे वरच्या दिशेला येऊन परत जमिनीत दुमडतात. त्यांचा आकार गुडघ्यासारखा दिसतो म्हणून त्याला ‘गुडघ्यासारखी मुळे’ (नी रूट्स) या नावाने ओळखतात. या प्रजातीत बीजांकुरित फळांची (प्रवर्ध्याची) लांबी १५ सेंटिमीटर असून ती गडद हिरवी असतात. फुलाच्या अवस्थेतून फळात रूपांतर होत असताना फुलाच्या बाहेरील दल देठाच्या भागाकडे वळते यावरून ही प्रजाती ओळखली जाऊ शकते.
ब्रूगेराचे लाकूड एक उत्कृष्ट इंधन आणि कोळशाचा स्रोत मानले जाते. ब्रूगेरा सीलिंड्रिकाचे लाकूड मजबूत व रंगाने लालसर असून त्याचा उपयोग स्थानिक लोकांकडून बांधकामासाठी केला जातो. तसेच या झाडाच्या सालीमध्ये टॅनिन मोठय़ा प्रमाणात आढळते. काही ठिकाणी याची बीजांकुरित फळे उकळून नारळ व साखरेसोबत खाल्ली जातात. स्थानिक मच्छीमारांच्या म्हणण्यानुसार मासे पकडण्याच्या सापळय़ासाठी शक्यतो या लाकडाचा उपयोग केला जात नाही कारण लाकडाला विशिष्ट वास आहे, ज्यामुळे मासे दूर पळतात. मात्र याच्या श्वसनमुळांचा अर्क अत्तर तयार करण्यासाठी वापरतात.
ब्रूगेरा सीलिंड्रिकाची मुळे, पाने, फुले ही डास नियंत्रण कीटकनाशक म्हणून वापरली जातात. झाडापासून बीजांकुरित फळे विलग होऊन पाण्यावर आडवी तरंगतात. बीजांकुरित फळांचा खालचा भाग पाणी शोषून घेऊन जड होतो व काही आठवडय़ांतच ते फळ रुजण्यास तयार होते. अशा प्रकारे या प्रजाती निसर्गामध्ये आपले स्थान प्रस्थापित करतात.
– डॉ. तरन्नुम मुल्ला
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : www.mavipa.org