समुद्रविज्ञान (ओशनोग्राफी) या विषयात करिअर करण्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून जीवशास्त्र, प्राणीशास्त्र इत्यादी विषयांत पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घ्यावे लागते. संशोधनाची आवड असल्यास विद्यावाचस्पती होऊन शास्त्रज्ञ म्हणून नोकरी करता येते. एनआयओसारख्या किंवा सीआयएफई या वर्सोवा स्थित  अभिमत विद्यापीठात प्रशिक्षण आणि संशोधन संधी उपलब्ध आहेत. येथे कमीत कमी ३-७ दिवस ते ६ महिने किंवा १ वर्ष कालावधीसाठी मत्स्य व्यावसायिक व विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा घेण्यात येतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेक परदेशी विद्यापीठांत समुद्रविज्ञान संलग्न शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्या विविध विद्यापीठातून आपली भारतीय मुले याबाबत शिक्षण घेत आहेत. संशोधन नौकेवर ‘ऑन बोर्ड’ राहून विदा संकलन करणे, तसेच सक्रिय क्षेत्र-अभ्यास करणे या दोन्हीची आवड असणाऱ्यांनीच हे अभ्यास क्षेत्र निवडावे. 

हेही वाचा >>> कुतूहल : शास्त्रज्ञांपुढले पाच आव्हानात्मक प्रदेश

सागरी  जलचर, शैवाल, पाणवनस्पती व रासायनिक घटक इत्यादीबद्दल विदा गोळा करणे, पाणी, माती, शैवाल ह्यांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत विविध चाचण्या करणे, त्याचे विश्लेषण करून शोध निबंध लिहिणे, देशात किंवा विदेशात विज्ञान परिषदांमध्ये ते सर्वांच्या समक्ष मांडणे असे कार्य समुद्रवैज्ञानिकाला करावे लागते. समुद्र अभ्यासताना पाण्यातील रासायनिक घडामोडींचा अभ्यास, भरती ओहोटीचे मापन, समुद्राच्या तळाशी असणाऱ्या डोंगर, ज्वालामुखी व जीवाश्म ह्यांचा अभ्यास, उपग्रहाने दिलेल्या विदेचे विश्लेषण करणे अशी कामे शास्त्रज्ञ करीत असतात.  

भारतात  सरकारी, निमसरकारी, एनजीओ अशा आस्थापनात  गुणवत्तेनुसार समुद्र वैज्ञानिक आणि मत्स्यशास्त्रज्ञांची रिक्त पदे भरली जातात. भविष्यात समुद्र वनस्पतींतील औषधी गुण शोधणे, शाश्वत मार्गाने मासेमारी करणे व हवामानबदलाविषयी अभ्यास करणे यासाठी या क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होतील. सागरी जैवतंत्रज्ञान हे आधुनिक शास्त्रही उदयाला येत आहे. अजूनही समुद्राविषयी खूप रहस्ये उलगडायची आहेत. 

हेही वाचा >>> कुतूहल: स्थानिक युवकांना रोजगार देणारे..

सतत समुद्राच्या सान्निध्यात राहणाऱ्या जनसामान्यांना स्थलांतरित पक्षी, डॉल्फिन, प्रवाळ, इतर जलचरांबद्दल माहिती जाणून निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीने प्रशिक्षण घेऊन व्यवसाय करण्याची संधी चालून येते. यातूनच  जैवविविधता संरक्षण होऊन शाश्वत पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. काही समुद्रप्रेमी किंवा निसर्गतज्ज्ञ छंद म्हणून समुद्र, मासे, पक्षी व जलचरांचे अवलोकन, अभ्यास आणि छायाचित्रांच्या माध्यमातून समुद्राबद्दलच्या ज्ञानात मोलाची भर घालतात.

– डॉ. श्वेता चिटणीस

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org