जॉन मॅकार्थी संगणक शास्त्रातील एक अग्रणी आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे मुख्य संशोधक. १९५६ साली डाट्र्मथ परिषदेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही संज्ञा वापरण्यात आली, मात्र मॅकार्थी यांनी एक वर्ष आधीच हा शब्द वापरला होता.
मॅकार्थी यांनी कॅलटेक शैक्षणिक संस्थेत गणित विषयाचे प्राध्यापक होण्यासाठी बीएस शैक्षणिक पदवीला प्रवेश घेतला. १९४८ मध्ये त्यांनी पदवी मिळविली आणि त्यानंतर पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. १९५१ मध्ये प्रिन्सटन विद्यापीठातून पीएच.डी. प्राप्त केली. काही काळ डाट्र्मथ आणि एमआयटी या संस्थांत प्राध्यापक म्हणून कार्य केल्यावर स्टॅनफर्ड विद्यापीठात ते कायमस्वरूपी प्राध्यापक झाले. निवृत्तीपर्यंत ते तिथेच शिक्षणाचे कार्य करत राहिले.
‘सेरेब्रल मेकॅनिजम्स इन बिहेवियर’ या परिषदेत भाग घेऊन आल्यावर माणसाप्रमाणे विचार करू शकणाऱ्या यंत्रांची निर्मिती करायची या एकाच ध्येयाने त्यांना पछाडले आणि त्यातूनच कृत्रिम बुद्धिमत्तेचा जन्म झाला. मॅकार्थी यांचा असा ठाम विश्वास होता की मानवी अध्ययन प्रक्रिया किंवा बुद्धिमत्तेची विविध वैशिष्टय़े यांचे इतके अचूक वर्णन करता येईल, की त्यांचे अनुकरण करणे यंत्राला शक्य होईल.
संगणक वापरकर्त्यांना त्यांचे संगणक एका मध्यवर्ती संगणकाशी जोडून माहितीची देवाण-घेवाण सुलभपणे करता येऊ शकेल अशी संगणक जोडणी संकल्पना त्यांनी १९६० च्या दशकात विकसित केली. ही संकल्पना हे आंतरजालाच्या विकासात महत्त्वाचे योगदान ठरले. आज प्रचलित झालेल्या क्लाऊड कॉम्प्युटिंग प्रणालीची, सव्र्हरमध्ये माहितीचे संचय करण्याची ती नांदी ठरली.
स्टॅनफर्ड या प्रयोगशाळेने अनेक मानवी कौशल्यांची म्हणजे दृष्टी, श्रवण-शक्ती, तर्क आणि हालचाली यांची नक्कल करता येणाऱ्या कृत्रिम प्रणाली तयार केल्या. १९७०च्या दशकात, मॅकार्थी यांनी संगणकाद्वारे खरेदी आणि विक्री करण्याबाबत एक पथदर्शी शोधलेख सादर केला. आज ज्याला ई-कॉमर्स म्हणतात ती ही संकल्पना होती.
मॅकार्थी यांना नोबेल पारितोषिकसम टय़ुरिंग पुरस्कार (१९७१) व क्योटो पुरस्कार (१९८८) देऊन गौरवण्यात आले. त्याशिवाय नॅशनल मेडल ऑफ सायन्स (यूएस) (१९९०), फ्रँकलिन संस्थेकडून संगणक आणि संज्ञानात्मक विज्ञानात बेंजामिन फ्रँकलिन पदक (२००३) तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बुद्धिमत्ता प्रणालीच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदानासाठी आयईईई इंटेलिजंट सिस्टीमच्या हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करून त्यांना सन्मानित करण्यात आले.
डॉ. किशोर कुलकर्णी, मराठी विज्ञान परिषद