ढगफुटी म्हणजे २० ते ३० किलोमीटर क्षेत्रात अचानक ताशी १० सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडणे. ढगफुटी पृथ्वीपासून साधारण १५ किलोमीटर उंचीवर होते. ‘ओरोग्राफिक लिफ्ट’ या प्रक्रियेद्वारे क्युमुलोनिम्बस हे भरपूर बाष्प असलेले व पाऊस देणारे ढग उबदार हवेच्या तीव्र प्रवाहामुळे वर ढकलले जातात. ते उंचावर पोहोचतात तसे या ढगांमधील पाण्याचे थेंब मोठे होतात. अशा ढगांना वारे दुसरीकडे नेऊ शकत नसल्याने ते त्याच क्षेत्रावर थोड्या वेळात मोठ्या प्रमाणात पाऊस पाडतात. वाळवंटांत आणि डोंगराळ भागांत ढगफुटीच्या घटना मोठ्या प्रमाणात होतात. डोंगराळ भागात ढगफुटीमुळे भूस्खलन होते. हवामान बदलांमुळे ढगफुटीच्या प्रमाणात वाढ होत आहे हे सिद्ध झाले आहे.

ढगफुटीचा इशारा देण्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होऊ लागला आहे. हवामानाच्या घटकांची निरीक्षणे मिळवण्यासाठी आवश्यक स्वयंचलित उपकरणे व रडार यांचे अत्यंत दाट जाळे अतिउच्च क्षमतेच्या अत्याधुनिक संगणकाला जोडलेले असावे लागते. उच्च रिझोल्यूशनच्या हवामानाच्या अंदाजाचे प्रारूप वापरून निरीक्षणांच्या विदांचे विश्लेषण करून ढगफुटीचा अंदाज ६ ते १२ तास आधी वर्तवणे शक्य होते.

भूतकाळातील ढगफुटीच्या घटनांची व सद्या:स्थितीतील हवामानाच्या घटकांची विदा, कृत्रिम बुद्धिमत्ता व यंत्रशिक्षण प्रारूपे यांचा वापर करून ढगफुटीचा नमुना ओळखता येतो. उपग्रह व रडार यांच्याद्वारे मिळालेल्या प्रतिमांचे विश्लेषण करून ढग तयार होण्याच्या प्रक्रियेसह त्यांचा मार्ग समजतो. बहुप्रारूपांचा (एनसेंबल्ड मॉडेल्स) वापर केल्याने अंदाजाची अचूकता वाढते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सखोल अभ्यासाच्या क्षमतेमुळे वातावरणातील क्लिष्ट घटकांचे अतिजलद विश्लेषण करून ढगफुटीसाठी तयार होणारी हवामानाची असामान्य स्थिती ओळखता येते. सपोर्ट व्हेक्टर मशीन हे तंत्रज्ञान आपत्ती व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरते.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून जपान, अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया, युरोपीयन महासंघ इत्यादी ठिकाणी वर्तविलेले ढगफुटीचे अंदाज यशस्वी झाले आहेत. आता भारतातही निरीक्षणे घेणाऱ्या स्वयंचलित यंत्रणा व सक्षम संगणक उपलब्ध होत आहेत. भूतकाळातील ढगफुटीच्या घटनांची विदा वापरून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे तयार केलेल्या अंदाजांच्या प्रणालीचा वापर ढगफुटीच्या संभाव्य ठिकाणी करण्याचे प्रयोग सुरू आहेत. भौगोलिक वैशिष्ट्ये व अनिश्चिततेमुळे ढगफुटीचा अचूक अंदाज अपेक्षित वेळेत देणे हे भारतासाठी अजून तरी आव्हानात्मकच आहे.

अनघा शिराळकर, मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org