सायबेरियातील विवरे ही पृथ्वीवरील सर्वात विचित्र आणि अगदी अलीकडील काळात निर्माण झालेल्या भूवैज्ञानिक रहस्यांपैकी एक आहेत. रशियाच्या दोन द्वीपकल्पांमधल्या या काहीशा मोठ्या आकाराच्या विवरांचा पत्ता २०१४ मध्ये लागला. तेव्हापासून ही विवरे आकाराने मोठी होत आहेत; आणि संख्येनेही वाढत आहेत. परंतु ती नक्की कशामुळे निर्माण झाली हे मात्र अजूनही समजलेले नाही.
ही विवरे सामान्यत: ३० ते ५० मीटर खोल आणि २० ते ४० मीटर रुंद असतात. ती वर्षानुवर्षे तयार होत असण्याची शक्यता आहे. त्यांच्या संख्येचा अंदाज करणे कठीण आहे. अशी विवरे सामान्यत: आर्क्टिकच्या निर्जन आणि दुर्गम क्षेत्रात आहेत. त्यामुळे ती प्रत्यक्ष बघणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. नेहमीच्या हेलिकॉप्टरच्या उड्डाणांदरम्यान आणि रेनडियर पाळणारे किंवा शिकारी यांना ही विवरे बहुतेक वेळा अपघातानेच आढळली.
त्यांच्या निर्मितीविषयी विविध वैज्ञानिकांनी निरनिराळी स्पष्टीकरणे दिली आहेत. ‘उल्काघातांमुळे निर्माण झालेली विवरे’ इथपासून ते ‘परग्रहवासीयांनी (एलियन्स) तयार केलेली विवरे’ अशा कितीतरी कल्पना याबाबतीत लोकांनी लढवल्या. तथापि सायबेरियातली भूमी सदैव गोठलेली असते. तिला चिर-अतिशीत (पर्माफ्रॉस्ट) असेच म्हणतात. त्यामुळे सध्याच्या हवामानबदलामुळे वाढणाऱ्या उष्णतेचा परिणाम होऊन गोठलेला बर्फ गरम होऊन त्यातून बाहेर पडणाऱ्या मिथेन वायूच्या बुडबुड्यांमधून ही विवरे निर्माण झाली असावीत असाही एक मतप्रवाह आहे. असे असले तरी ही प्रचंड विवरे नेमकी का आणि कशी निर्माण झाली, हे अजूनही एक मोठे गूढ आहे. आणि अनेक वैज्ञानिकांना हवामान बदलाची यात मोठी भूमिका असावी अशी खात्री आहे. भविष्यात संशोधकांना कदाचित या प्रदेशात यापेक्षा जास्त विवरे सापडतील असा अंदाज आहे.
हवामानातील बदलामुळे मिथेनची निर्मिती होण्याची प्रक्रिया नेमकी कशी होत असावी, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरीही, अतितीव्र उन्हाळ्यांनंतर इथे अनेक विवरे तयार होतात, असे दिसून आले आहे. त्यावरून अनेक संशोधकांना असे वाटते, की जागतिक तापमानवाढ होण्याचा ही विवरे तयार होण्याशी काहीतरी संबंध आहे. तिथे राहाणाऱ्या आणि काम करणाऱ्या लोकांसह आर्क्टिकच्या भवितव्याच्या संदर्भात या विवरांचा काय अर्थ आहे असे प्रश्नही अनुत्तरित आहेत. आर्क्टिकचा अभ्यास करणाऱ्यांपैकी बऱ्याचजणांसाठी ते एक अस्वस्थ करणारे लक्षण आहे.
आपल्या ग्रहाच्या अतिउत्तरेकडील या थंड, अत्यंत तुरळक लोकसंख्या प्रदेशात अशा विवरांच्या निर्मितीमुळे काही आमूलाग्र आणि अपरिवर्तनीय बदल तर होत नाहीत ना, अशी शंका काहीजणांना वाटू शकते.
डॉ. श्रीकांत कार्लेकर
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : www.mavipa.org