१ मे १९९७ हा दिवस बुद्धिबळाच्या आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या इतिहासात मैलाचा दगड समजला जातो. या दिवशी ‘डीप ब्लू’ या संगणकाने गॅरी कास्पारोव्ह या बुद्धिबळाच्या रशियन जगज्जेत्याचा स्पर्धेत पराभव केला आणि सर्व जगात खळबळ माजली.
बुद्धिबळाचा खेळ हा बुद्धिमत्तेचा अंतिम निकष आणि त्याचा जगज्जेत्ता हा बुद्धिमत्तेचा शिखरबिंदू असा एक समज आहे. त्यामुळे हा पराभव म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेने मानवी बुद्धिमत्तेचा केलेला पराभव समजला गेला. पण खरे तर आज आपण ज्याला कृत्रिम बुद्धिमत्ता समजतो तशी ही कृत्रिम बुद्धिमत्ता नव्हती तर ज्याला ‘एक्स्पर्ट सिस्टीम’ म्हणतात त्या पद्धतीची ‘डीप ब्लू’ ही प्रणाली होती.
हेही वाचा >>> कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बुद्धिबळ
बुद्धिबळात सर्वमान्य असलेल्या सुरुवातीच्या खेळ्या, अनेक नामवंत बुद्धिबळपटूंच्या सामन्यातील शेवटच्या खेळ्या ‘डीप ब्लू’मध्ये भरण्यात आल्या होत्या. जागतिक दर्जाच्या बुद्धिबळपटूंमध्ये झालेल्या अनेक सामन्यांची माहिती त्याच्यात होती. त्यातून कोणत्या परिस्थितीत कोणती खेळी योग्य ठरेल हे त्याचे सॉफ्टवेअर ठरवत होते. दोन सामन्यांच्या मधल्या काळात चार ग्रँडमास्टर्सच्या चमूच्या मदतीने त्याचे सॉफ्टवेअर सुधारले जात होते.
त्याचे हार्डवेअर ‘व्हीएलएसआय’ तंत्रज्ञान वापरून बुद्धिबळासाठी खास निर्मिलेल्या चिप्सच्या साह्याने घडले होते. खेळातल्या पुढच्या सहा-सात आणि काही बाबतीत अगदी वीस खेळ्यांचा विचार तो करू शकत होता. अनेक शक्यतांचा विचार करणाऱ्या ‘ब्रूट फोर्स’ तंत्राचा वापर यात करण्यात आला होता. तो सेकंदाला पटावरील २० कोटी परिस्थितींचा विचार करू शकत होता. त्याच्याच १९९६च्या आवृत्तीच्या तुलनेत ही गणनक्षमता दुप्पट होती.
या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्याच्या ४४व्या खेळीच्या वेळी ‘डीप ब्लू’च्या आज्ञावलीत असलेल्या एका ‘बग’मुळे तो चुकून एका लूपमध्ये अडकला आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याने एक यादृच्छिक (रँडम) खेळी केली. या खेळीने कास्पारोव्ह गोंधळला. आज्ञावलीत असलेल्या चुकीमुळे केलेल्या या अनपेक्षित खेळीचे श्रेय त्याने ‘डीप ब्लू’च्या असाधारण बुद्धिमत्तेला दिले आणि त्याच्या खेळावर याचा परिणाम झाला.
ही स्पर्धा हरल्यानंतर कास्पारोव्हने केलेली ‘डीप ब्लू’बरोबर आणखी एका स्पर्धेची विनंती ‘आयबीएम’ने नाकारली. कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी बुद्धिमत्तेला बुद्धिबळात मात देऊ शकते हे सिद्ध करणे हा आमचा उद्देश होता आणि तो सफल झाला आहे, असे कारण त्यासाठी देण्यात आले.
पण ज्या पद्धतीने माणूस विचार करतो त्या पद्धतीने विचार करून ‘डीप ब्लू’ने ही स्पर्धा जिंकली नव्हती. त्यासाठी अनेक दशकांची वाट बघावी लागली.
– मकरंद भोंसले
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org