पृथ्वीवर अनेक ज्वालामुखीय पर्वत आहेत; मात्र इतर सर्व ज्वालामुखीय पर्वतांपेक्षा आफ्रिकेतील किलिमांजारो या ज्वालामुखीय पर्वताचे वेगळेपण ठसठशीतपणे नजरेत भरते. आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील टांझानियामध्ये केनिया देशाच्या सीमेजवळच, मोम्बासा शहराच्या पश्चिमेला सुमारे २५० किमी अंतरावर किलिमांजारो पर्वत आहे. तो आफ्रिका खंडातला सर्वात उंच पर्वत असून साधारणपणे वायव्य-आग्नेय दिशेत पसरलेला आहे. याची लांबी सुमारे ११० किमी आणि रुंदी ६५ किमी आहे. हा एक ‘निद्रिस्त’ (डॉर्मंट) ज्वालामुखीय पर्वत, म्हणजे जिथला ज्वालामुखीय उद्रेक दीर्घ काळापासून थांबलेला आहे, असा ज्वालामुखीय पर्वत आहे.
प्राचीन काळात इथे तीन वेळा, तीन वेगवेगळ्या मुखांतून ज्वालामुखीचा उद्रेक होऊन त्याची निर्मिती झाली आहे. तीन निद्रिस्त ज्वालामुखी असलेला हा जगातील सर्वात उंच, स्वतंत्रपणे उभा असलेला गिरिपिंड (फ्रीस्टँडिंग मासिफ) आहे. म्हणजेच तो कुठल्याही पर्वतरांगेचा भाग नाही. यातील ‘किबो’ हे सर्वांत उंच ज्वालामुखीय शिखर समुद्रसपाटीपासून ५,५५८ मी. उंचीवर आहे. विषुववृत्ताच्या दक्षिणेला केवळ ३०० किमी अंतरावर असूनही हे शिखर त्याच्या उंचीमुळे सतत हिमाच्छादित असते. किलिमांजारो पर्वताच्या विशिष्ट भौगोलिक स्थानामुळे त्याचे स्वत:चे असे स्वतंत्र हवामान तयार झाले आहे. डिसेंबर आणि मे या महिन्यांमध्ये इथे नेहमीच हिमवृष्टी होते; तर मार्च, एप्रिल आणि नोव्हेंबर या महिन्यांमध्ये भरपूर पाऊस पडतो.
पर्वताच्या माथ्यावर ज्वालामुखीच्या तोंडापाशी ८८७ मीटर रुंदीचे एक खोलगट विवर (व्होल्कॅनिक क्रेटर) पडलेले दिसून येते. पूर्वीच्या मोठ्या वर्तुळाकृती विवरांच्या खुणा आजही दिसतात. त्यात बाहेरच्या मोठ्या विवराचा परीघ २.६ किमी, आणि मधल्या विवराचा परीघ १.८ किमी आहे. सर्वात आतले लहान विवर ८ मीटर खोल आणि २४० मीटर रुंद आहे. त्यात सुमारे ६० मी. जाडीचा बर्फाचा थर असतो. याला जोडूनच पूर्वेकडे १२ किमी.वर ‘मावेन्झी’ हे ५,०१८ मी. उंचीचे दुसरे, तर पश्चिमेकडे १७ किमी अंतरावर ‘शिरा’ हे ३,८६४ मी. उंचीचे तिसरे ज्वालामुखी शिखर आहे. मावेन्झी हे उघडे बोडके आणि ज्वालामुखीजन्य राखेने युक्त असे विवर आहे.
किलिमांजारो हा आफ्रिकेतल्या स्वाहिली भाषेतला शब्द असून ‘किलिमा’ (पर्वत) आणि ‘जारो’ (शुभ्र) या शब्दांवरून हे नाव आले असावे. पण स्थानिक ‘किचागा’ भाषेत याचा अर्थ ‘आमचा पर्वत’ असा होतो.
‘भव्य पर्वत’ (ग्रेट माउंटन) या अर्थानेही तो ओळखला जातो. असे म्हटले जाते, की एव्हरेस्टच्या तुलनेत किलिमांजारोवरील चढाईत जास्त गिर्यारोहकांना प्राण गमवावे लागले आहेत.
– डॉ. श्रीकांत कार्लेकर, मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org