पृथ्वीचे अंतरंग हा पूर्वीपासूनच कुतूहलाचा विषय आहे. मानवी मर्यादांमुळे आजवर मानव पृथ्वीच्या अंतर्भागात पोहोचू शकलेला नाही; तरीदेखील आधुनिक तंत्रज्ञानामुळे त्याबद्दल माहिती नक्कीच मिळवू शकला आहे. पृथ्वीच्या अंतर्भागाचे प्रामुख्याने तीन भाग पडतात. सर्वांत वरचा भाग कवच, त्याखाली असणारा भाग प्रावरण आणि सर्वांत आत असणारा भाग म्हणजे गाभा. ‘द कोर’ नावाच्या इंग्रजी चित्रपटात पृथ्वीच्या गाभ्याबद्दल बरेच रंजक आणि काल्पनिक कथानक पाहायला मिळते. चंद्रावर जाऊन आलेल्या मानवाला पृथ्वीच्या गाभ्यापर्यंत पोहोचता आलेले नाही त्यामुळे असे कल्पनाविस्तार होतच रहाणार आहेत. पृथ्वीच्या मध्यापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांत महत्त्वाचा अडसर म्हणजे खोलीनुसार वाढत जाणारे अंतर्भागातील प्रचंड तापमान.

गाभ्याविषयी माहिती मिळवण्याचे सर्वांत महत्त्वाचे आणि विश्वसनीय साधन म्हणजे भूकंपलहरी. ही बाब सर्वप्रथम १८९७ च्या आसाम भूकंपाच्या लहरींवर संशोधन करताना, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागातले भूवैज्ञानिक रिचर्ड डिक्सन ओल्डहॅम यांच्या लक्षात आली. त्यांच्या निरीक्षणानुसार भूगर्भात भूकंपलहरी सरळ प्रवास न करता अडथळा ओलांडल्यासारख्या दुसऱ्या मार्गाने प्रवास करतात. त्यावरून त्यांनी मध्ये येणाऱ्या भागाची घनता जास्त असली पाहिजे, हे नेमकेपणाने ताडले.

इंगे लेहमान या डॅनिश भूभौतिकीतज्ज्ञ आणि भूकंपवैज्ञानिक होत्या. १९३६ साली भूकंपलहरींचा अभ्यास करून त्यांनी सांगितले की, पृथ्वीच्या गाभ्याचे अंतर्गाभा आणि बाह्यगाभा असे दोन भाग आहेत. बाह्यगाभा द्रवरूप असून त्यात चुंबकत्वाचा गुणधर्म दिसून येतो. कालांतराने १९४९ साली वॉल्टर एल्सासर आणि एडवर्ड बुलार्ड यांनी केंब्रिज विद्यापीठामध्ये केलेल्या संशोधनाधारे दाखवून दिले की, हा भाग लोह आणि निकेल यापासून बनलेला आहे. पृथ्वी तिच्या आसाभोवती फिरते. त्यामुळे ती स्वत:च एखाद्या जनित्राप्रमाणे कार्य करते; परिणामी चुंबकीय क्षेत्र निर्माण होते.

भूकंप लहरींच्या अभ्यासावरून अंतर्भाग घनस्वरूपाचा असल्याचे मांडले गेले आहे. पृथ्वीच्या गाभ्याचे सरासरी तापमान ५००० अंश सेंटीग्रेड असते. पृथ्वीच्या बाह्यकवचामुळे या भागातील तापमानात चढउतार होत नाही. अंतर्भागात असणाऱ्या युरेनियम, थोरियम या किरणोत्सारी (रेडिओअॅक्टिव्ह) मूलद्रव्यांची समस्थानिके (आयसोटोप्स) हळूहळू स्थिर मूलद्रव्यांमध्ये बदलतात. यातून मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होत असल्याने हा भाग प्रचंड प्रमाणात उष्ण असतो. या भागात निर्माण होत असलेल्या चुंबकीय क्षेत्रामुळे सौर किरणोत्सर्गापासून पृथ्वीचे संरक्षण होते; ही बाब सजीव सृष्टीच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. तसेच गाभ्यात निर्माण होणारी उष्णता भूगर्भीय प्रक्रियांना चालना देते.

डॉ. अभिजीत पाटील

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org