जिथे भूकंपाचे धक्के कधी जाणवणारच नाहीत, अशी जागा पृथ्वीवर नाही. तथापि, काही ठिकाणे अशी आहेत, की जिथे भूकंप अगदी क्वचित जाणवतो, आणि जेव्हा केव्हा भूकंप होतो तेव्हा त्याची तीव्रता खूपच कमी असते. या उलट जगाच्या पाठीवर जपानसारखे असेही काही टापू आहेत, जिथे वारंवार भूकंप होतात आणि त्यातले काही भूकंप तर अत्यंत विनाशकारी असतात. अशा टापूंना आपण भूकंपप्रवण क्षेत्रे म्हणतो.
पॅसिफिक समुद्राभोवतीचा पट्टा जगातील सर्वांत तीव्र भूकंप आणि ज्वालामुखी यांसाठी प्रसिद्ध आहे. ज्या भूकंपांची नोंद आतापावेतो झाली आहे त्यातले जवळपास ८१ भूकंप या पट्ट्यात झाले आहेत. या अस्थिर पट्ट्याला ‘पॅसिफिकभोवतीचे अग्निकंकण’ (सर्कम-पॅसिफिक रिंग ऑफ फायर) असे नाव पडले आहे. १९६० साली चिलीमध्ये झालेला ९.५ रिश्टर स्केलचा भूकंप आणि १९६२ साली अलास्का इथे झालेला ९.२ रिश्टर स्केलचा भूकंप ही या पट्ट्यातील महाविध्वंसक भूकंपांची उदाहरणे आहेत. जपान या पट्ट्यात येतो म्हणूनच जपानमध्ये वारंवार भूकंप होत असतात.
अल्पाइड (अल्पाइड बेल्ट) हा पट्टा अंशत: युरेशियाच्या दक्षिणेला आहे. जगातील भूकंपाच्या १५ भूकंप या पट्ट्यात झालेले आहेत. जावा-सुमात्रा बेटांपासून हा पट्टा सुरू होऊन तिथून तो हिमालयाकडे येतो, आणि हिमालयातून पुढे पश्चिमेकडे भूमध्य समुद्रातून निघून अॅटलांटिक सागरापर्यंत जाऊन समाप्त होतो. २००४ साली झालेला सुमात्रा बेटावरील ९.१ रिश्टर स्केलचा भूकंप आणि २००५ साली पाकिस्तानमध्ये झालेला ७.६ रिश्टर स्केलचा भूकंप हे या पट्ट्यातले उल्लेखनीय भूकंप म्हणून सांगता येतील.
अटलांटिक महासागराच्या मधोमध उत्तर-दक्षिण पसरलेली एक पर्वतरांग आहे. त्या पर्वतरांगेला ‘मध्य-अटलांटिक कटक’ (मिड-अटलांटिक रिज) म्हणतात. तीही भूकंपप्रवण आहे. आर्क्टिक सागरापासून सुरू झालेली ही १६,००० किमी लांबीची पाण्याखालची पर्वतरांग जवळजवळ आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकापर्यंत येते. ती दोन सांरचनिक भूपट्ट्यांची सीमा आरेखित करते. या रेषेच्या दोन बाजूंचे भूपट्टे अत्यंत मंदगतीने एकमेकांपासून लांब सरकत आहेत. आणि त्यांच्यामध्ये नवी भूमी निर्माण होत आहे. या पर्वतरांगेवर काही ज्वालामुखी आहेत. त्यांचे कधी कधी उद्रेक होतात. आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या लाव्हारसामुळे ही नवी भूमी तयार होत आहे.
भारतीय उपखंडाबाबत बोलायचे, तर हिमालयाचा भाग अल्पाइड पट्ट्यात येतो. या पट्ट्यात येणारी सर्व भूमी भूकंपप्रवण आहे. तथापि, त्या पट्ट्याबाहेरही कच्छ, लातूर, जबलपूर आणि अन्य काही भूकंपप्रवण ठिकाणे आहेत.
– अनघा शिराळकर, मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org