एडवर्ड फ्रेडकिन हे एक अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ आणि भौतिक शास्त्रज्ञ होते. ते जगातील पहिल्या संगणक प्रोग्रामरपैकी एक होते. त्यांना डिजिटल भौतिकशास्त्र आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रारंभिक प्रणेते म्हणून ओळखले जाते. त्यांनी ‘विश्वाकडे एक विस्तृत संगणकीय प्रणाली म्हणून पाहिले जाऊ शकते’ अशी संकल्पना मांडली. तसेच असामान्य बुद्धिमत्ताधारक यंत्रांची (हायपर-इंटेलिजेंट मशीन्स) संकल्पनाही पुढे आणली.

फ्रेडकिन यांचा जन्म २ ऑक्टोबर सन १९३४ रोजी कॅलिफोर्नियामधील लॉस अँजेलिस येथे झाला. हवाई दलात भरती होऊन ते पायलट झाले. तेथे त्यांनी रडार इंटरसेप्टर ऑपरेटर होण्याचे प्रशिक्षण घेतले. संगणकाच्या आगमनानंतर, हवाई दलाने त्यांना एमआयटीमध्ये संगणक कसे प्रोग्रॅम करायचे हे शिकण्यासाठी पाठवले आणि फ्रेडकिन हे जगातील पहिले मास्टर प्रोग्रामर बनले.

फ्रेडकिन यांनी १९६२ मध्ये ‘इन्फॉर्मेशन इंटरनॅशनल इनकॉर्पोरेटेड’ या एका प्रारंभिक संगणक तंत्रज्ञान कंपनीची स्थापना केली. त्यांनी तयार केलेल्या ‘प्रोग्रामेबल फिल्म रीडर’मुळे संगणकांना हवाई दलाच्या रडार कॅमेऱ्यांनी टिपलेल्या विदेचे विश्लेषण करता आले. त्यांना हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरसह संगणकात व्यापक रस होता. त्यांनी पीडीपी-१ असेंब्लर भाषा आणि तिची पहिली ऑपरेटिंग सिस्टम लिहिली. तसेच ‘सिक्वेन्स ब्रेक’ या पहिल्या आधुनिक व्यत्यय प्रणालीची रचना केली. त्यांनी वापरकर्त्यांना विशिष्ट विदा शोधण्याची मुभा देऊन ती पुन्हा मिळविण्याची प्रक्रिया सुधारणारे ट्राय डेटा स्ट्रक्चर, वाहन ओळखणारे रेडिओ ट्रान्सपॉन्डर्स, ऑटोमोबाइल्सची कॉम्प्युटर नेव्हिगेशनची संकल्पना, फ्रेडकिन गेट (संगणकात वापर होणारे एक इलेक्ट्रोनिक सर्किट) आणि रिव्हर्सिबल कॉम्प्युटिंगच्या ‘बिलियर्ड-बॉल’ संगणकीय प्रारूपाचे शोध लावले. संगणक दृष्टी (कॉम्प्युटर व्हिजन), बुद्धिबळासाठी लागणारी प्रारंभिक विकास प्रणाली आणि कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधनाच्या क्षेत्रातही त्यांचे योगदान आहे. प्राध्यापक फ्रेडकिन यांनी सन १९८० मध्ये जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा पहिला संगणक प्रोग्राम विकसित करणाऱ्यासाठी फ्रेडकिन पारितोषिक सुरू करून, बॉबी फिशरना चेकमेट करण्यासाठी मशीन्सचा मार्ग मोकळा केला. त्याचाच परिणाम म्हणून आयबीएम प्रोग्रामरच्या एका टीमने, सन १९९७ मध्ये त्यांच्या डीप ब्लू संगणकाने, जागतिक बुद्धिबळपटू, गॅरी कास्परोव्हला हरवून हे पारितोषिक मिळवले.

रिव्हर्सिबल कॉम्प्युटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कॉम्प्लेक्स सिस्टीम या संगणक विज्ञानातील फ्रेडकिन यांच्या योगदानामुळे त्यांना विज्ञानातील ‘डिक्सन’ हे पारितोषिक मिळाले. ८८ वर्षांच्या फ्रेडकिन यांचे १३ जून, २०२३ रोजी ब्रुकलाइन, मॅसॅच्युसेट्समध्ये निधन झाले.

गौरी सागर देशपांडे, मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org