कृत्रिम बुद्धिमत्ता ही संगणकशास्त्राची एक उपशाखा असून असा संगणक किंवा यांत्रिक प्रणाली निर्माण करणे हे तिचे उद्दिष्ट आहे. सामान्यपणे मनुष्य आपली बुद्धी वापरून जी कामे करतो ती सर्व कामे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने करता यावीत, अशी त्यामागची संकल्पना आहे. याची सुरुवात काही विशिष्ट गोष्टी परिपूर्णपणे करणाऱ्या यंत्रमानवांच्या (रोबोट) निर्मितीने- जागतिक स्तरावरील अव्वल बुद्धिबळपटूला हरवणाऱ्या ‘डीप ब्ल्यू’ या प्रणालीने झाली. मात्र ती यंत्रणा अन्य काही काम करू शकत नव्हती त्यामुळे नंतर मोडीत काढण्यात आली. स्वप्न आहे ते संपूर्ण मानवसदृश समर्थ असलेला यंत्रमानव साकारणे, ज्याला इंग्रजीत ‘ह्युमनॉइड’ अशी संज्ञा आहे.
अशा मानवसदृश यंत्रमानवाच्या विकासाचे दोन पैलू आहेत. एक आहे कृत्रिम बुद्धिमत्ता, जी विविध गणिती व इतर पद्धती आज्ञावली स्वरूपात विकसित करून सुनियोजितपणे कृती करण्यास दिशा देते. त्याला इंग्रजीत ‘सॉफ्टवेअर’ म्हणतात. दुसरा तितकाच महत्त्वाचा अभियांत्रिकी पैलू आहे, जो इंग्रजीत ‘हार्डवेअर’ म्हणून संबोधला जातो. त्यातील कार्यसाधक (मॅनीप्युलेटर) हा मुख्य भाग इतर भागांशी जोडण्या आणि हालचाली यांच्याशी संबंधित असतो; अंतिम परिणामक (एंड इफेक्टर) हे कार्यसाधकाचे शेवटचे टोक असते; प्रेरक (अॅक्च्युएटर) हा कार्यसाधकाचा स्नायू असल्याप्रमाणे काम करतो. संवेदक (सेन्सर) हा भाग आंतरिक आणि बाह्य वातावरणातील माहिती गोळा करतो. नियंत्रक (कंट्रोलर) अंतिम परिणामकाचे काम नियंत्रित करतो तर, प्रक्रियक (प्रोसेसर) हा यंत्रमानवाच्या मेंदूचे काम करतो, म्हणजे सर्व भागांची गती आणि दिशा यांचा मागोवा घेऊन आवश्यक ते बदल घडवतो. जवळपास सर्व यंत्रमानवांची जडणघडण याच धर्तीवर केलेली असते.
पदार्थ विज्ञानातील अलीकडच्या प्रगतीमुळे वरील अभियांत्रिकी घटक ‘चुणचुणीत’ (स्मार्ट) झाले आहेत. म्हणजे ते आता वजनाला हलके, लवचीक आणि दीर्घकाळ टिकू शकतात. तसेच नवीन संयुगांनी बनलेले भाग कितीही रूपांतरित केले, वाकवले, तापवले किंवा थंड केले तरी, कार्य संपल्यावर ते आपला मूळ आकार तंतोतंतपणे घेऊ शकतात. त्याशिवाय अब्जांशी तंत्रज्ञान (नॅनोटेक्नोलॉजी) निर्माण करत असलेले घटक यंत्रमानवाच्या कार्यक्षेत्राच्या व्याप्तीत तसेच कार्यक्षमतेत अतुलनीय सुधारणा करत आहेत. नवी उंची गाठण्यास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळेच नाजूक अतिसूक्ष्म-शस्त्रक्रियेपासून परग्रहावर बग्गी चालविण्यास सक्षम असणारे कार्यक्षम यंत्रमानव निर्माण करण्यास गती मिळाली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या पैलूंमुळे पूर्वी स्वप्नवत असलेल्या गोष्टी प्रत्यक्षात आल्या आहेत.
डॉ. विवेक पाटकर,मराठी विज्ञान परिषद