नैतिकता हा अत्यंत वादाचा विषय आहे. एका माणसाच्या दृष्टीने न्याय्य असलेली गोष्ट दुसऱ्या माणसाच्या नजरेतून तशीच दिसेल असे आपण खात्रीने सांगू शकत नाही. यासंबंधीचे समज, निकष, पूर्वग्रह यांच्या बाबतीत अनेक फरक असू शकतात. मुळातच नेमकी सीमारेषा आखणे कठीण असलेल्या या विषयांच्या संदर्भात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाने खूपच खळबळ माजवली आहे. याचे कारण म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानामुळे घडू शकणाऱ्या गोष्टी नैतिकतेच्या फुटपट्टीने नेमक्या कशा मोजायच्या याविषयी स्पष्टता आलेली नाहीच; पण आधी उल्लेख केल्याप्रमाणे मुळातच नैतिकतेची व्याख्या करणे काहीसे कठीण असल्यामुळे हा विषय वादग्रस्त ठरतो. देशोदेशी या संदर्भात अनेक पातळ्यांवर काम सुरू आहे. त्यात कायदे करण्यापासून हे तंत्रज्ञान उभे करणाऱ्या लोकांनी नेमकी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याविषयीचे संकेत घालून देण्यापर्यंत अनेक प्रयत्न सुरू आहेत.

सर्वसामान्यपणे कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नैतिकतेच्या बाबतीत तीन प्रश्न उभे राहतात: लोकांचा खासगीपणा आणि त्यांच्यावर पाळत ठेवली जाणे, पूर्वग्रहदूषित मानसिकतेमुळे केला जाणारा भेदभाव आणि या तंत्रज्ञानामध्ये मानवी निर्णयक्षमतेला असलेले स्थान. यामधल्या पहिल्या दोन मुद्दयांबद्दल आता समाजात काही प्रमाणात जागरूकता आहे. लोकांच्या खासगीपणावर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विविध उपप्रकारांच्या साहाय्याने केले जाणारे हल्ले काही प्रमाणात आपल्या परिचयाचे असतील. यात आपण इंटरनेटवर केलेल्या मुशाफिरीवर पाळत ठेवून त्यानुसार आपल्याला दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातींपासून आपल्या बँक खात्याच्या तपशिलानुसार आपल्यावर कर्जे, विविध प्रकारच्या गुंतवणूक योजना यांचा होत असलेला भडिमार अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो.

पूर्वग्रहदूषित मानसिकता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा खूप जवळचा संबंध आहे. याचे कारण म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान माणसानेच तयार केलेल्या माहितीच्या अफाट साठ्यांच्या आधारावर उभे राहिलेले असल्यामुळे माणसाच्या मनातल्या पूर्वग्रहांचे पडसाद कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानात जसेच्या तसे उमटतात. म्हणूनच अमेरिकेमध्ये कृष्णवर्णीयांना रोजगाराच्या संधी नाकारल्या जाणे, त्यांना कर्जे न मिळणे, स्त्रियांना भेदभावाची वागणूक मिळणे यासंबंधीचे अनेक निर्णय कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाने घेतले असल्याचे आढळले आहे. म्हणजेच पूर्वग्रह जसे माणसांना अन्याय्य निर्णय घेण्यास प्रवृत्त करतात, तसेच आता कृत्रिम बुद्धिमत्तेबाबतही घडताना दिसू लागले आहे. असे प्रकार टाळण्यासाठीच्या उपाययोजना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानात समाविष्ट करण्याच्या मागणीने जोर धरल्याचे दिसते.

अतुल कहाते

Story img Loader