सागरकिनाऱ्यांजवळच्या पर्यटनासाठी एमटीडीसी- महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळ यांनी तारकर्ली येथे जे जागतिक स्कूबा डायिव्हग केंद्र विकसित केलेले आहे त्यात डॉ. सारंग कुलकर्णी यांचे महत्त्वाचे योगदान आहे. भारतीय वायुसेनेच्या २३५ अधिकाऱ्यांच्या २० तुकडय़ांना अमेरिकेतील ‘पाडी प्रोफेशनल असोसिएशन ऑफ स्कूबा डायिव्हग’मार्फत चार दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. यात विशेष प्रावीण्य मिळवण्यासाठी एक महिन्याचे प्रशिक्षण याच संस्थेत देतात. १५ मीटर खोली आणि २५ मीटर लांबी-रुंदीच्या संरक्षित तलावात आणि भर समुद्रात असे प्रशिक्षण देण्यात येते. हजारोहून अधिक देशी आणि विदेशी तरुणांनी रात्री आणि दिवसा खोल सागरात व बुडालेल्या जहाजात जाण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. यात त्यांना स्कूबा आणि स्नॉर्केिलग शिकवले गेले.
सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी माढा तालुक्यातील बेंबळे गावी जन्मलेले सारंग कुलकर्णी लहानपणापासून कोळी मित्रांसोबत होडी चालवायला आणि पोहायला शिकले. पदवीपर्यंतचे शिक्षण वालचंद महाविद्यालय, सोलापूर येथे झाले. प्राणिविज्ञानातील पदवी मिळवून नंतर गोव्यातील समुद्रविज्ञान विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण आणि ‘अंदमानातील प्रवाळ’ या विषयावर पुणे विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागातून १९९६ साली पीएच.डी. मिळवली. त्यांचा अभ्यास सागरी जीव संवर्धनावर होता. नंतर त्यांनी ऑस्ट्रेलियातून स्कूबा डायिव्हग प्रशिक्षण घेतले. केंद्र शासनाची शास्त्रज्ञ होण्याची ऑफर नाकारून ते अंदमान येथे प्रवाळ संशोधन करण्यासाठी गेले असता, तिथे आलेल्या त्सुनामीमध्ये स्थानिकांना वाचविण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले.
त्सुनामीमुळे निर्माण होणाऱ्या स्थानिक समस्या टाळायच्या असल्यास स्थानिक मच्छीमार समुदायासाठी रोजगार संधी निर्माण कराव्यात, यासाठी २००६ मध्ये महाराष्ट्र शासनाने त्यांना सिंधुदुर्गात काम करण्याची संधी दिली. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून त्यांनी २००८ पासून मालवण पर्यटन केंद्रामार्फत हजारो स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला. त्यांच्यामुळे वसई, अलिबागपासून ते थेट गोव्यापर्यंतच्या किनाऱ्यावर नौकानयन,
सागरी स्कूटर, स्नॉर्केलिंग असे पर्यटन विकसित झाले आहे. त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून पाच तरुणांना यासाठी प्रशिक्षण देण्याची योजना पूर्ण केली आहे. यातूनच नव्या प्रवाळ खडकांचा शोध, प्रवाळ खडकांना अडकलेली माशांची जाळी सोडवणे, सागरी जीव संवर्धन असे उपक्रम त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी राबविले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या नियोजित सागर विद्यापीठाच्या समितीचे ते सल्लागार आहेत.
मोहन मद्वाण्णा,मराठी विज्ञान परिषद