साडेनऊ कोटी वर्षांपूर्वीपासून ते साडेसहा कोटी वर्षांपूर्वीपर्यंत, तीन कोटी वर्षांच्या काळात, नर्मदा नदीच्या खोऱ्यात सर्वत्र डायनोसॉरचे साम्राज्य होते. त्यातल्या काही डायनोसॉरचे अवशेष गुजरातच्या महीसागर जिल्ह्यातल्या रहिओली गावानजीक १९८१ मध्ये सापडले. काही कामगारांना तिथल्या खाणीत पपनसाएवढे चुनखडकाचे गोळे मिळाले. तपशीलवार अभ्यासानंतर ते डायनोसॉरच्या अंड्यांचे जीवाश्म आहेत असे लक्षात आले. त्यामुळे तिथे डायनोसॉरचे अवशेष शोधण्याचे ठरले.

हे काम खूप काळजीपूर्वक करावे लागते. कामगारांना अगदी हलक्या हाताने खोदकाम करण्यास सांगितले जाते. अन्यथा हाडाचे तुकडे होऊ शकतात. उत्खननाच्या ठिकाणी स्वत: संशोधक दिवसभर जातीने उपस्थित असतात. प्रत्येक हाड, अथवा हाडाचा तुकडा मिळाला, की त्याच्यावर क्रमांक टाकून नोंद करावी लागते. पुढचे प्रयोगशाळेतले कामही जिकिरीचे असते. त्या जातीच्या एकाच डायनोसॉरची हाडे आहेत की वेगवेगळ्या डायनोसॉर्सची आहेत, ते बघावे लागते. प्रत्येकाची हाडे ओळखून ती वेगवेगळी ठेवावी लागतात. तज्ज्ञ संशोधक सांगाड्यांची जुळवाजुळव करतात. मग तो डायनोसॉर आकाराने नेमका किती मोठा होता, त्याची शहानिशा होते. जिवंत असताना तो डायनोसॉर कसा दिसत असेल, हे संशोधक आणि चित्रकार चर्चा करून ठरवतात. तेव्हा कुठे चित्रकाराच्या कुंचल्यातून तो डायनोसॉर चित्ररूपाने साकार होतो.

रहिओलीला दोन वर्षे उत्खनन चालले. पुढचे संशोधन काही भारतीय आणि काही विदेशी पुराजीववैज्ञानिकांनी मिळून केले. ते १८ वर्षे चालले. मग त्या डायनोसॉराला ‘राजासॉरस नर्मदेन्सिस’ असे वैज्ञानिक नाव देण्यात आले. ‘राजासॉरस’ हे प्रजातीचे नाव असून त्याचा अर्थ ‘सरड्यांचा राजा’ असे आहे. त्या नावाचे मूळ ‘राजन्’ या संस्कृत शब्दात आहे. ‘नर्मदेन्सिस’ हे त्याच्या जातीचे नाव आहे. त्याचे जीवाश्म नर्मदेच्या खोऱ्यात सापडले असे ते दर्शवते.

सात ते दहा मीटर लांबीचा आणि सुमारे चार टन वजनाचा हा डायनोसॉर मांसाहारी होता. पुढचे पाय अगदी छोटे होते. आणि मागच्या दोन पायांचा उपयोग करून तो चालत असे. काहीशी लांब असणारी मान आणि लांब शेपटी यांच्यामुळे चालताना त्याचा तोल सांभाळला जाई. राजासॉरसच्या अवशेषांवर वैज्ञानिक संशोधन करत असतानाच १९९५ आणि १९९६ मध्ये रहीओलीजवळच दुसऱ्या एका डायनोसॉराचे अवशेष सापडले. त्याला नाव दिले आहे ‘रहीओलीसॉरस गुजरातेन्सिस’. हे दोन्ही डायनोसॉर ज्या पाषाणसमूहात सापडले, त्याला लॅमेटा पाषाणसमूह असे नाव आहे. हा पाषाणसमूह गोड्या पाण्यातल्या अवसादांपासून (सेडिमेंट्स) निर्माण झालेला आहे.

डॉ. विद्याधर बोरकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

Story img Loader