कोणत्याही सुविधा नसतानाही बालपण आनंदात गेले असे सांगणारे डॉ. बबन इंगोले म्हणजे सकारात्मक उत्साह-ऊर्जेचा स्रोत आहेत. मराठवाडय़ात हिंगोलीमधील दुष्काळग्रस्त खेडय़ात कनिष्ठ मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डॉ. इंगोले यांनी सुरू केलेला शैक्षणिक प्रवास कालांतराने अंटाक्र्टिकापर्यंत पोहोचला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घरापासून १६ किलोमीटर लांब असलेल्या माध्यमिक शाळेत जाताना शेतांमधून पायी मार्गक्रमण करणाऱ्या शाळकरी बबनना निसर्गाशी जवळीक साधण्याची संधी मिळाली. मराठवाडा विद्यापीठातून बी.एस्सी.ची पदवी घेतल्यानंतर त्यांनी कोकण कृषी विद्यापीठातून एम.एस्सी.ची पदवी संपादन केली. त्यासाठी त्यांना सरकारी शिष्यवृत्ती मिळाली होती. त्यानंतर राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेमध्ये (एनआयओ) संशोधक म्हणून रुजू होऊन त्यांनी पीएच.डी. पदवीही प्राप्त केली. या संशोधनादरम्यान त्यांनी स्कुबा डायिव्हगची कौशल्येही आत्मसात केली. जागतिक पातळीवरील पर्यावरणसंबंधित उपक्रमांमध्ये सल्लागार म्हणून त्यांचे अतिशय मोलाचे योगदान आहे.

४० वर्षांहून अधिक काळ त्यांनी सागरी संशोधनात व्यतीत केला आहे. त्यांना प्रगत मत्स्यशास्त्रातील अभ्यासासाठी जपानची शिष्यवृत्ती मिळाली. त्या वेळी जपानी भाषादेखील ते शिकले. सागरी जैवविविधता, प्रदूषण, पर्यावरण प्रभाव मूल्यांकन, सागरी प्राण्यांचे वर्गीकरण, मत्स्यशेती या क्षेत्रांमधील त्यांचे प्रभुत्व प्रशंसनीय आहे. म्हणूनच अत्यंत अभिमानास्पद अंटाक्र्टिका मोहिमेसाठी त्यांची सागरी संशोधक म्हणून तीन वेळा निवड झाली. तेथील ‘दक्षिण गंगोत्री’ व ‘मैत्री’ या दोन्ही संशोधन केंद्रांतील तीन मोहिमांमधील त्यांचा कार्यकाल दीड वर्षांचा आहे. या मोहिमांमध्ये अंटाक्र्टिकामधील गोडय़ा पाण्याच्या जलाशयांचा सखोल अभ्यास, त्या पाण्याची पिण्यासाठी योग्यता, क्रील फिशरी व मानवाचा तेथील पर्यावरणावरील प्रभाव या विषयांवर त्यांनी संशोधन केले. खोल सागरातील जैवविविधता, त्सुनामी अभ्यास मोहीम या उपक्रमांमधील त्यांचा सहभाग उल्लेखनीय आहे. त्यांचे १०० हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी ९० विद्यार्थ्यांना पदव्युत्तर प्रबंधांसाठी आणि १४ विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले आहे. कोकण कृषी विद्यापीठाचे तत्कालीन अधीक्षक डॉ. शिरगुर यांनी डॉ. इंगोलेंमध्ये संशोधनाची बीजे रोवून त्यांच्या प्रवासास योग्य दिशा दिली. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेमधील डॉ. राव व डॉ. परुळेकर यांच्या मार्गदर्शनामुळे सेवानिवृत्तीनंतरही ते गोव्याच्या राष्ट्रीय ध्रुवीय व सागरी संशोधन केंद्रामध्ये शास्त्रज्ञ म्हणून सक्रिय आहेत.

डॉ. पूनम कुर्वे ,मराठी विज्ञान परिषद

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta kutuhal farming family to scientist in antarctica amy
Show comments