कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान जोपर्यंत फक्त तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तींपुरतेच मर्यादित होते किंवा निव्वळ गंमत म्हणून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत होते तोपर्यंत मानवी निर्णयक्षमता हीच कृत्रिम बुद्धिमत्तेपेक्षा श्रेष्ठ ठरते, असे मानले जात असे. आता मात्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाने लोकांना अवाक करून सोडणाऱ्या गोष्टी सहजसाध्य केल्यामुळे ती मानवी निर्णयक्षमतेवर मात करू शकते की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. स्वाभाविकपणे या मुद्द्यासंबंधी अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू आहे. अजून तरी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाने मानवी निर्णयक्षमतेवर आणि नैतिकतेच्या पातळीवर अजिबातच मात केलेली नसल्याचे अनेक घटनांवरून स्पष्ट होते.

अमेरिकेच्या अरिझोना राज्यात उबर कंपनी एका चालकविरहित म्हणजेच स्वयंचलित मोटारीची चाचणी घेत होती. त्या वेळी रस्त्यातून एक माणूस आपली सायकल ढकलत नेत असल्याचे लक्षात न आल्यामुळे या मोटारीने त्याला धडक दिली आणि त्या माणसाचा मृत्यू झाला. खरे म्हणजे अशी काही दुर्घटना घडू नये म्हणून त्या गाडीत एक चालकदेखील असतो. त्याने तातडीने गाडीचे नियंत्रण स्वत:कडे घेऊन हा प्रसंग टाळणे अपेक्षित होते; पण तो व्हिडीओ गेम खेळण्यात दंग होता.

समोर आलेली कुठलीही गोष्ट गाडीला लावलेल्या कॅमेऱ्याने टिपली जाणे, तिचे विश्लेषण होऊन समोर माणूस आहे, याचा संदेश गाडीच्या नियंत्रण प्रणालीकडे जाणे अपेक्षित होते; पण त्यासाठीच्या सॉफ्टवेअरने हे विश्लेषण योग्यरीत्या केले नाही आणि त्यामुळे दुर्घटना घडली. समोर माणूस आहे हेच स्वयंचलित गाडीला कळले नाही. मानवी चालकाने लक्ष दिले असते, तर ही दुर्घटना नक्कीच टाळता आली असती.

अलीकडे आपले काम सोपे करण्यासाठी अनेक जण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचा आधार घेताना दिसतात. उदाहरणार्थ, निवडणुकीच्या संदर्भातील विश्लेषण करण्यासाठी समजा एखाद्या माध्यमाने असे केले तर त्यात मानवी नैतिकता, मानवी विचार, मानवी भूमिका या गोष्टी कितपत येतील, असा प्रश्न उभा राहतो. ज्या माहितीच्या आधारे कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान हे विश्लेषण करेल त्यामधले सगळे दोष, तसेच पूर्वग्रह या विश्लेषणात उतरतील आणि त्याचे परिणाम भयंकर असू शकतील. त्यामुळे हे विश्लेषण जसेच्या तसे प्रसारित करणे किंवा छापणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. याचा गैरवापर करण्यासाठी अनेक जण टपूनच बसलेले असतील, हे वेगळे सांगण्याची गरज नाही!

अतुल कहाते

Story img Loader