सुरत येथील एका पारशी परिवारात दाराशॉ यांचा जन्म १८८३ मधे झाला. त्यांचे वडील रेल्वेमध्ये स्टेशनमास्तर होते. त्यामुळे वडिलांच्या बदल्या होत. म्हणून लहान दाराशॉला शिक्षणासाठी सुरतला आजोळी ठेवले होते. ते १२ वर्षांचे असताना वाडिया कुटुंब वडोदरा येथे राहायला गेले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वडोदऱ्याला महाविद्यालयीन शिक्षण घेताना त्यांना निसर्ग निरीक्षणाची गोडी लागली. वनस्पतीविज्ञान, प्राणीविज्ञान आणि भूविज्ञान हे विषय घेऊन त्यांनी मुंबई विद्यापीठाची एम. ए. ही पदवी मिळवली. कारण तेव्हा वडोदऱ्याचे महाविद्यालय मुंबई विद्यापीठाला जोडलेले होते. तसेच त्या काळी विज्ञान विद्याशाखेत शिक्षण घेतले तरी बी. ए. आणि एम. ए. याच पदव्या मिळत असत.

१९०७ मधे जम्मू येथे प्रिन्स ऑफ वेल्स महाविद्यालय (आताचे गांधी स्मारक महाविद्यालय) सुरू झाले. तिथे भूविज्ञान विभागाचे प्राध्यापक म्हणून वाडिया यांची वयाच्या चोविसाव्या वर्षी नियुक्ती करण्यात आली. तिथे शिकवताना त्यांच्या लक्षात आले, की ‘भारतीय प्रस्तरविज्ञान’ (इंडियन स्ट्रॅटिग्राफी) या विषयासाठी विद्यार्थ्यांना नजरेसमोर ठेवून लिहिलेले पाठ्यपुस्तक उपलब्ध नाही.

खरे तर भारतीय उपखंडाच्या भूवैज्ञानिक अभ्यासाला एकोणिसाव्या शतकात प्रारंभ झाल्याने भारताच्या प्रस्तरविज्ञानाविषयी बरीच माहिती जमा झाली होती. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण या विभागाने त्या माहितीचे संकलन करून त्यावर १८८७ मधे एक ग्रंथही प्रकाशित केला होता. त्यानंतरही नवी माहिती गोळा झाली, तेव्हा १८९३ मध्ये त्याची दुसरी सुधारित आवृत्तीही प्रकाशित केली होती. पण त्यातली माहिती खूपच विस्तृत होती.

विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन भारतीय प्रस्तरविज्ञानाचे पाठ्यपुस्तक लिहिणे आवश्यक होते. ती गरज वाडिया यांनी १९१९ मध्ये ‘जिऑलॉंजी ऑफ इंडिया’ हे आदर्श पाठ्यपुस्तक लिहून पूर्ण केली. या पुस्तकाच्या सहा आवृत्त्या निघाल्या. सहावी आवृत्ती १९६६ मध्ये प्रकाशित झाली. ५० वर्षांहून अधिक काळ त्यांच्या पुस्तकाचा उपयोग भारतातल्या विद्यार्थ्यांना झाला.

१९२० मध्ये वाडिया यांची नियुक्ती भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण या विभागात करण्यात आली, तेव्हा त्यांनी जम्मूच्या अगदी जवळच एका विलुप्त (एक्स्टिंक्ट) हत्तीच्या जीवाश्मांचा शोध लावला. त्या प्राण्याचे वैज्ञानिक नाव आहे स्टेगॉडॉन गणेशा.

निवृत्तीनंतर भारतीय अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते. देहराडून येथील भारतीय हिमालयन भूविज्ञान संस्था स्थापन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. त्या संस्थेचे ते पहिले संचालकही होते. वाडिया यांच्या सन्मानार्थ त्या संस्थेचे नाव आता ‘वाडिया हिमालयन भूविज्ञान संस्था’ असे करण्यात आले आहे.

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta kutuhal first director of geological institute darashaw wadia amy